कोंढव्यातील घटनेने खळबळ
marathinews24.com
पुणे – पैशाच्या वादातून मित्राने साथीदारांच्या मदतीने एकाच्या डोक्यात आणि चेहर्यावर दगड मारून खून केल्याची घटना १० ते ११ मे कालावधीत कोंढव्यातील भैरवनाथ मंदीरामागे घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. अभय जगन्नाथ कदम (वय २४, रा. तालीम चौक, कोंढवा खुर्द ) आणि बादल शाम शेरकर (वय २४ रा. बधे चाळ, कोंढवा खुर्द ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सुभाष रघुवीर परदेशी (वय ५२ रा. गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) असे खून केलेल्याचे नाव आहे. त्यांची पत्नी हेमलता परदेशी (वय ४५ ) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
वाहन चोरट्याला अटक, १४ लाखांची ६ वाहने जप्त; काळेपडळ पोलिसांची कामगिरी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभय आणि सुभाष परदेशी यांच्यात पैशांची देवाण-घेवाण झाली होती. मात्र, काही दिवसांपासून सुभाषने उरलेले पैसे दिले नसल्याच्या रागातून आरोपीने साथीदाराला बोलावून घेतले. त्यानंतर सुभाषला कोंढवा खुर्दमधील भैरवनाथ मंदीरामागे बोलावून घेतले. त्याठिकाणी त्यांच्यात वादविवाद झाले. त्याच रागातून आरोपी अभयसह बादल शेरकर याने सुभाष यांच्या डोक्यासह चेहर्यावर दगड मारून त्यांना गंभीर जखमी केले. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे सुभाषचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप तपास करीत आहेत.
पुण्यात आठवड्यात ३ खूनाच्या घटना
गंभीर गुन्ह्याचा आलेख कमी करण्यासाठी पुणे पोलिसांकडून प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र, आठवड्याभरात पुन्हा ३ खूनाच्या घटना घडल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पदपथावर झोपलेल्या किशोर कांबळे (वय ३७) याचा खून झाल्याची घटना ५ मे ला घडली होती. तर वादातून पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर मृतदेह दुचाकीवर घेउन चाललेल्या आरोपी पतीला पोलिसांनी रंगेहात पकडल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. ही घटना आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. त्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खूनाच्या घटनेमुळे पुन्हा एकदा हल्लेखोरांची हिम्मत वाढल्याचे दिसून आले ओह.