उद्योजक राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरण
marathinews24.com
पुणे – Rana Suryavanshi Attack Case : उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावरील खुनी हल्ल्याच्या तपासात सुपारीच्या पैशांच्या साखळीचे कनेक्शन उघडकीस आले आहे. १८ ऑक्टोबरला बारामतीजवळील कटफळ गावालगत राणा यांच्या तत्कालीन वाहन चालकानेच हल्लेखोरांना २ लाखांची सुपारी दिली होती. त्यानंतर अल्पवयीनासह दोघांनी त्यांच्यावर सत्तूरने वार करून गंभीररित्या जखमी केले होते. हल्ला करण्यासाठी रक्कम वाटपात मोठी साखळी असल्याचे आतापर्यंतच्या तपासात उघडकीस आले आहे.
गांजा तस्करीत पुणे पोलिसाला पकडले – सविस्तर बातमी
आरोपी ज्ञानदेव शिंदे याने हल्लेखोर अल्पवयीन आणि पार्थ अवथळे यांना सुपारी दिली होती. तर स्वप्निल कांबळे आणि निनाद महाडिक यांनी शिंदेला हल्ला करण्यास सांगून पैसे दिले होते. मात्र, कांबळे आणि महाडिक यांना हे पैसे ज्ञानेश्वर साळुंखे आणि चैतन्य बाबर यांच्या सांगण्यावरून देण्यात आले. याप्रकरणी चैतन्य बाबर याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना त्याच्याकडे चौकशी केली असता, (Rana Suryavanshi Attack Case) या प्रकरणाबाबत फारशी माहिती नसल्याचे त्याने सांगितले. ज्ञानेश्वर साळुंखे याला संबंधित प्रकरणाची अधिक माहिती असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे साळुंखेला ताब्यात घेतल्यानंतर गुन्ह्याचा तपास आणखी पुढे जाणार आहे.
आरोपी ज्ञानदेव शिंदे याने हर्षवर्धन झोळ यांच्या सांगण्यावरून हल्ला केल्याचे बोलले जात होते. प्रत्यक्षात मात्र, तपासात याला अधिकची पुष्टी मिळाली नाही. हल्लेखोरांना पैसे देण्यासाठी जुळवाजुळव करणार्या साळुंखेला ताब्यात घेतल्यानंतर पैशांचा व्यवहार नेमका कसा झाला, हल्ल्याचा आदेश कोणी दिला, कारण काय होते, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. १८ ऑक्टोबरला सायंकाळी सव्वासातच्या सुमारास बारामतीत राणावर हल्ला झाला होता. हल्ल्यासाठी सत्तूरचा वापर केला असून, पोलिसांनी तो जप्त केला आहे. हल्ल्यासाठी सुपारी देण्यामागील व्यक्ती आणि पैशांच्या व्यवहाराचा तपास सुरू झाला.
























