४ कोटी ४० लाखांचा वार्षिक कृती आराखडा मंजूर
marathinews24.com
पुणे – एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन २०२५-२६ या वर्षात ‘औषधी वनस्पती लागवड’ घटक नव्याने समाविष्ट करण्यात आला असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी या घटकाचा लाभ होण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार औषधी व सुगंधी वनस्पती लागवड हा घटक नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे. औषधी व सुगंधी वनस्पती लागवड या घटकाकरिता केंद्र शासनाने सन २०२५ -२६ मध्ये ४ कोटी ४० लक्ष एवढ्या रकमेच्या वार्षिक कृती आराखड्यास मंजूरी दिलेली आहे. औषधी व सुगंधी वनस्पतींचे पीकनिहाय आर्थिक मापदंड पुढीलप्रमाणे आहेत.
ज्येष्ठमध किंवा मुलेठी, शतावरी, कालीहारी किंवा कळलावी, सफेद मुसळी, गुग्गुळ, मंजिष्ठा, कुटकी, अतिस, जटामासी, अश्वगंधा, ब्राम्ही, तुलसी, विदारीकंद, पिंपळी, चिराटा, पुष्करमूळ या औषधी वनस्पतीकरीता प्रतिहेक्टर १ लाख ५० हजार रुपये; गुलाब, रोझमेरी, निशिगंध,जिरेनियम, कॅमोमाईल, चंदन, दवणा, जाई, लॅव्हेंडर या महाग सुगंधी वनस्पतीकरीता १ लाख २५ हजार रुपये आणि इतर सुगंधी वनस्पतीकरीता ५० हजार रुपये सर्वसाधारण क्षेत्रात ४० टक्के तर अधिसूचित क्षेत्रामध्ये ५० टक्के (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसहाय्य करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.