कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय ‘अमृतप्रभा समूहगान’ स्पर्धेचे आयोजन
marathinews24.com
पुणे – दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीतर्फे शालेय तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय ‘अमृतप्रभा समूहगान’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. गीत सादरीकरणासाठी यंदा ‘ध्वजगीत/झेंडागीत’ असा विषय देण्यात आला आहे, अशी माहिती स्पर्धा समन्वयक प्रसाद भडसावळे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ – पहिली ट्रायल रन यशस्वी! – सविस्तर बातमी
पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त डॉ. प्रभाताई अत्रे यांच्या नव्वदीपूर्तीनिमित्त डॉ. प्रभाताई अत्रे यांच्या इच्छेनुसार ‘अमृतप्रभा समूहगीत गायन स्पर्धा’ सुरू केली आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच देशाभिमान आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात रुजावी म्हणून 2023 मध्ये देशभक्तीपर व 2024 मध्ये प्रार्थना गीतांची स्पर्धा घेण्यात आली. यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांना ‘ध्वजगीत/झेंडागीत’ या विषयावर गीत सादर करायचे आहे. स्पर्धा मंगळवार, दि.५ ऑगस्टला घेण्यात येणार असून पारितोषिक वितरण समारंभ बुधवार, दि. 6 ऑगस्टला आयोजित केला आहे. स्पर्धेसाठी प्रवेशमूल्य नाही.
पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि कनिष्ठ महाविद्यालय अशा तीन गटात स्पर्धा घेण्यात येणार आहे. प्रत्येक गटात तीन बक्षिसे आणि उत्तेजनार्थ बक्षिस दिले जाणार आहे. गीत सादर करण्याचा कालावधी कमित कमी तीन ते जास्तीत जास्त पाच मिनिटे आहे. स्पर्धक संख्या कमित कमी आठ ते जास्तीत जास्त 12 इतकी असावी. संवादिनी, तबला अथवा ढोलक, ढोलकी किंवा इतर वाद्यांची संख्या चारपेक्षा जास्त नसावी.
इलेक्ट्रॉनिक वाद्यांना परवानगी नाही तसेच ट्रॅकवर गाणे सादर करता येणार नाही. एका संस्थेला तीनही गटात सादरीकरण करता येणार आहे. प्रत्येक गटासाठी स्वतंत्र प्रवेशअर्ज देणे आवश्यक आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी संतोष अत्रे (मो. 9850977828) यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेसाठी प्रवेशअर्ज पाठविण्याची अंतिम मुदत दि. 19 जुलै 2025 अशी आहे. प्रवेश अर्ज प्रत्यक्ष अथवा amrutprabharpes@gmail.com या ई-मेलवर पाठविता येणार आहे.