राजकीय नेत्याचा जावई सामील; कोकेन, गांज्यासह मद्याच्या बाटल्या जप्त
marathinews24.com
पुणे – पुण्यात हाॅटेलमधील मद्य पार्टीवर छापा; ७ जणांना अटक – हाॅटेलमधील खोलीत सुरू असलेल्या पार्टीवर गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री खराडीत छापा टाकून कारवाई केली. या पार्टीत अमली पदार्थ, दारु, हुक्काचे सेवन केले जात असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी याप्रकरणी दोन तरुणींसह सात जणांना अटक केली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या बड्या नेत्याच्या जावयाचा समावेश आहे. पोलिसांनी गांजा, कोकेनसदृश अमली पदार्थ, हुक्का पात्र, सुगंधी तंबाखू, १० मोबाइल, मद्याच्या बाटल्या, तसेच दोन मोटारी असा ४१ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिलेटरीमध्ये कामाला असल्याची केली बतावणी; महिलेला १ लाख ४० हजारांचा गंडा – सविस्तर बातमी
डाॅ. प्रांजल मनीष खेवलकर (वय ४१, रा. इंद्रप्रस्थ सोसायटी, हडपसर), निखिल जेठानंद पोपटाणी (वय ३५, रा. डीएसके, सुंदरबन, अमानोरा पार्कजवळ, हडपसर), समीर फकीर महमंद सय्यद (वय ४१, रा. हेरिटेज पॅले ऑर्चिड सोसायटी, एनआयबीएम रस्ता, कोंढवा), सचिन सोमाजी भोंबे (वय ४२, रा. द्वारिकानगर, वाघोली), श्रीपाद मोहन यादव (वय २७, रा. आनंदी सुंदर निवास बंगला, पंचतारानगर, आकुर्डी), इशा देवज्योत सिंग (वय २२, रा. कुमार बिर्ला सोसायटी, नागरस रस्ता, ओैंध), प्राची गोपाल शर्मा (वय २३, रा. गोदरेज ग्रीन सोसायटी, म्हाळुंगे) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २ ग्रॅम ७० मिलीग्रॅम कोकेन, ७० ग्रॅम गांजा सदृश पदार्थ,, हुक्का पात्र, दहा मोबाइल संच, सुगंधी तंबाखु, दोन मोटारी, मद्याच्या बाटल्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खराडी परिसरात रविवारी मध्यरात्री गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी स्टे बर्ड अझुर हाॅटेलमधील एका खोलीत पार्टी सुरू असून, पार्टीत अमली पदार्थांचा वापर केला जाणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर मध्यरात्री अडीचच्या सुमाास पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. तेव्हा तेथे डाॅ. खेवलकर, पोपटाणी, सय्यद, भोंबे, यादव, सिंग, शर्मा हे पार्टी करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तेथून कोकेन, गांजासदृश अमली पदार्थासह हुक्का पात्र, मद्याच्या बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस) खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलीस उपायुक्त पिंगळे यांनी नमूद केले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सुदर्शन गायकवाड, शैलेश संखे, स्मिता वासनिक, उपनिरीक्षक अस्मिता लाड आणि पथकाने ही कारवाई केली.
डाॅ. खेवलकर, पोपटाणी, सय्यद, भोंबे, यादव, सिंग, शर्मा यांची ओळख झाली. त्यानंतर ते एकमेकांच्या संपर्कात आले. पोपटाणी हा सिगारेट वितरक आहे. सय्यद याचा हार्डवेअर व्यवसाय आहे. यादव हा बांधकाम व्यावसायिक आहे. आरोपींनी यापूर्वी अशा प्रकारच्या पार्टीचे किती वेळा आयोजन केले, तसेच एकमेकांच्या नियमित संपर्कात होते का? यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. डाॅ. खेवलकर यांच्या बंगल्यावर पोलिसांनी छापा टाकला असून तेथून लॅपटाॅप आणि हार्ड डिस्क जप्त करण्यात आली आहे.
म्हणून राजकीय वर्तुळात खळबळ
खराडीतील पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेले डाॅ. प्रांजल खेवलकर हे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती आहेत. खडसे यांच्या जावयाला अटक करण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
खराडीतील पार्टीत पोलिसांनी गांजा, कोकेनसदृश अमली पदार्थ जप्त केले आहेत. जप्त केलेले अमली पदार्थ न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. याप्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. न्यायवैद्यकीय प्रयोगळशाळेच्या अहवाल मिळालेला नाही. अमली पदार्थ कोणी पुरविले, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे.- निखिल पिंगळे, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर
गृहपाठ न केल्याने विद्यार्थिनीला मारहाण, शिक्षिकेविरुद्ध गुन्हा
गृहपाठ न केल्याने सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीाला मारहाण केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी शाळेतील शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला.
विद्यार्थिनीच्या वडिलांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिक्षिकेविरुद्ध बाल न्याय (काळजी व संरक्षण) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांची १२ वर्षीय मुलगी एका शाळेत सहावीत शिकायला आहे. तिला भुगोल विषय शिकविणाऱ्या शिक्षिकेने गृहपाठ दिला होता. १८ जुलै रोजी विद्यार्थिनीने गृहपाठ केला नाही, या कारणावरून तिला शिक्षिकेने लाकडी पट्टीने मारले. मारहाणीत मुलीच्या हाताला सूज आली होती. मारहाणीमुळे मुलीला शारीरिक आणि मानसिक त्रास झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात येत आहे. संबंधित शिक्षिकेचा जबाब नोंदवून घेण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.





















