लोणी काळभोरमधील घटना
marathinews24.com
पुणे – महावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन चोरट्यांनी १ लाख ८० हजार रुपयांच्या तांब्याची तार चोरुन नेल्याची घटना लोणी काळभोर परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
केमिकल कंपनीच्या गोडावूनमधून ॲसिडचे कॅन चोरणारी टोळी गजाआड – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथील रामदरा रस्त्यावर मोडक इंटरनॅशनल स्कूलजवळ महावितरणचे रोहित्र आहे. चोरट्यांनी मध्यरात्री रोहित्राची तोडफोड करुन १ लाख ८० हजार रुपयांची तांब्याची तार चोरुन नेल्याची घटना नुकतीच घडली. रोहित्राची तोडफोड केल्यानंतर त्यातील ऑईल सांडले, तसेच या भागातील वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर नागरिकांनी महावितरणकडे तक्रार दिली. पोलीस कर्मचारी कोल्हे तपास करत आहेत.
पुणे शहरालगत असलेल्या ग्रामीण भागात महावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याच्या तारा चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. पुणे – अहिल्यानगर रस्त्यावरील वाघोली, लोणीकंद परिसरात महावितरणच्या रोहित्रांची तोडफोड करुन तांब्याची तार चोरून नेण्याच्या घटना नुकतीच घडली होती.
दुचाकीची डिक्की उचकटून रोकड चोरी
दुचाकीची डिक्की उचकटून चोरट्यांनी एक लाख ८० हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील पेरणे गाव परिसरात घडली. याबाबत एका तरुणाने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण व्यावासयिक आहे. पेरणे-डोंगरगाव रस्त्यावर समृद्धी डेव्हलपर्सजवळ १८ जून रोजी त्याने दुचाकी लावली होती. व्यावसायिक कामानिमित्त त्याने दुचाकीच्या डिक्कीत एक लाख ८० हजार रुपयांची रोकड ठेवली होती. चोरट्याने दुचाकीची डिक्की उचकटून रोकड चोरुन नेली. रोकड चोरल्याचे उघडकीस आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस कर्मचारी स्वप्नील जाधव तपास करत आहेत.




















