विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम अर्थात ‘एसआयआर’बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण सत्र संपन्न

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम अर्थात 'एसआयआर'बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण सत्र संपन्न

‘एसआयआर’च्या प्रभावी अंमलबजावणीकरिता मतदारसंघस्तरावर प्रशिक्षण सत्राचे आयोजन करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

marathinews24.com

पुणे – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम आजपासून जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात झाली आहे; याअंतर्गत मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी मतदार संघनिहाय मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजन करण्यासह एसआयआरबाबत व्यापक स्वरूपात जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले. राजकीय पक्षांसोबत उत्तम समन्वय साधून त्यांचा प्रक्रियेत सहभाग वाढवावा, माध्यमांशी वेळोवेळी संवाद तसेच सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवत हा कार्यक्रम यशस्वी करावा, असेही ते म्हणाले.

गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभ – सविस्तर बातमी 

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण सत्रात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा पिंपरी-चिंचवड मनपाचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, विभागीय आयुक्त कार्यालयाचे अपर आयुक्त तुषार ठोंबरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर,सर्व मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डूडी यावेळी म्हणाले, पुणे जिल्ह्यात मतदार संख्या राज्यात सर्वाधिक आहे. एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये व अपात्र मतदार यादीत समाविष्ट होऊ नये या उद्देशाने हा मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या गणना पत्रकाची छपाई आणि त्याचे वितरण नियोजनपद्धतीने करावे. एसआयआर प्रक्रियेबाबत प्रशिक्षण सत्रे आयोजित करुन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओंना प्रशिक्षण देण्यात यावे. मतदारांकडून गणना पत्रकात विचारलेली माहिती वेळेत भरली जाईल, याबाबत दक्षता घ्यावी. आवश्यक तिथे बीएलओंनी मतदारांना मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कार्यवाहीबाबत माहिती देण्यासाठी प्रत्येक बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांसोबत बैठक घेण्यात येणार आहे, त्याच प्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी यांनीही मतदारसंघ निहाय राजकीय पक्षांच्या तालुकाप्रमुखांसोबत बैठकीचे आयोजन करावे. त्यांना मतदान केंद्र प्रतिनिधींची (बीएलए) नेमणूक करण्यास सांगावे. अद्यापपर्यंत ‘अन मॅप’ झालेल्या मतदारांची यादी त्यांना उपलब्ध करुन द्यावी.

शहरी भागात गृह निर्माण संस्था आणि औद्योगिक आस्थापनासोबत बैठक आयोजित करुन प्रक्रिया पूर्ण करावी. तृतीयपंथीय, दिव्यांग, देह विक्री करणाऱ्या महिला, ८५ पेक्षा अधिक वयोवृद्ध मतदाराकरिता कार्यरत सामाजिक संघटनांची मदत घ्यावी. केलेल्या कामाची विविध माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी, असेही डुडी यांनी सूचना दिल्या. यावेळी कळसकर यांनी एसआयआर प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. उपस्थितांच्या शंकाचे निरसन करण्यात आले.

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम
या कार्यक्रमांतर्गत २९ जूनपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) प्रशिक्षण व गणना अर्ज छपाई, ३० जून ते २९ जुलै या कालावधीत बीएलओंमार्फत घरोघरी भेटी देऊन अर्ज वितरण, ५ ऑगस्ट रोजी तात्पुरत्या मतदार यादीची प्रसिद्धी, ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दावे आणि हरकती दाखल करणे, ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर दरम्यान दाखल हरकतींवर सुनावणी व ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×