फरासखाना पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – गणपती विसर्जन सोहळ्यात चोरट्यांनी भाविकांचे मोबाइल, महिलांचे दागिने लांबविल्याच्या घटना घडल्या. याप्रकरणी विश्रामबाग आणि फरासखाना पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. गणपती विसर्जन सोहळा पाहण्यासाटी शहर, तसेच परगावातून नागरिकांची गर्दी झाली होती. विसर्जन सोहळ्यातील गर्दीत चोरट्यांनी नागरिकांकडील मोबाइल, सोनसाखळ्या, मंगळसूत्र लांबविल्याच्या घटना घडल्या. बेलबाग चौकात रविवारी (७ सप्टेंबर) मध्यरात्री तरुणाकडील ६५ हजार रुपयांचा मोबाइल चोरट्यांनी लांबविला. याबाबत तरुणाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण पर्वती परिसरात राहायला आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक फौजदार मोकाशी तपास करत आहेत.
पोलिसांनी समन्वयातून बंदाेबस्त पार पडला- पोलीस आयुक्त अमितेश कुमार – सविस्तर बातमी
विसर्जन सोहळ्यात शनिवारी (६ सप्टेंबर) सकाळी साडेदहाच्या सुमारास ज्येष्ठ नागरिकाकडील १२ हजार रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी लांबविली. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस हवालदार कवठे तपास करत आहेत. तर कात्रज भागातून विसर्जन सोहळा पाहण्यासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील ८९ हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास लांबविल्याची घटना टिळक चौकात घडली. याबाबत महिलेने विश्रामबाग पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस हवालदार साबळे तपास करत आहेत.
तसेच शनिवार वाडा परिसरात तरुणाच्या गळ्यातील ४६ हजार रुपयांची सोनसाखळी लांबविल्याची घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास घडली. तक्रारदार तरुण पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी भागात राहायला आहेत. तो विसर्जन सोहळा पाहण्यासाठी मध्य भागात आला होता. तरुणाने याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार सचिन अहिवळे तपास करत आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे निलख भागात राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ५० हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविल्याची घटना बेलबाग चौकात घडली. याबाबत महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, हवालदार कदम तपास करत आहेत. तसेच लक्ष्मी रस्त्यावरील श्री गुरुजी तालीम मंडळ परिसरात चोरट्यांनी कोथरूड भागातील ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील १५ हजार रुपयांची सोनसाखळी लांबविली. त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर परिसरात तरुणाच्या गळ्यातील ५० हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. लक्ष्मी रस्त्यावरील सेवासदन चौकात तरुणाच्या गळ्यातील ५० हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली.
याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. तसेच विसर्जन सोहळा पाहण्यासाठी आलेल्या तरुणाकडील १ लाख २५ हजार रुपयांचे दोन महागडे मोबाइल चोरट्यांनी लांबविल्याची घटना शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. पोलीस हवालदार नितीन तेलंगे तपास करत आहेत.




















