निष्पाप वाहन चालक सापडतायेत मृत्यूच्या जाळ्यात
marathinews24.com
पुणे – बाह्यवळण मार्गावर असलेल्या नवले पुलावर अपघांताची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे परिसरातून नाईलाजास्तव प्रवास करणार्या सर्वसामान्यांना दरदिवशी जीव मुठीत घेउन मार्गस्थ व्हावे लागत आहे. अपघातानंतर जागे होणार्या एनएचआय, महापालिका, पोलीस, आरटीओ, वाहतूक विभागाला जाग येते. त्यानंतर दोन-चार दिवस तकलादू उपाययोजना राबवून वेळ निभावून नेली जात आहे. मात्र, दूरगामी पूल परिसरात आवश्यक उपाय योजनांची होणारी टाळाटाळ परिसरातील वाहन चालकांचे जीवन धोक्यात घालत आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी पुलावर होणार्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी योग्य नियोजनाला गती देत अपघात कमी होण्याच्या उपाययोजना राबवणे महत्वाचे आहे.
नवलेपुल अपघाताच्या पार्श्वभूमीवर अपघात रोखण्याकरिता उपाययोजना करा – सविस्तर बातमी
मुंबई-बंगलोर महामार्गाची वाट नवले पुलावरून जात असल्यामुळे दरदिवशी हजारो अवजड वाहने शहराजवळून मार्गस्थ होतात. विशेषतः मुंबईहून सातारा आणि कोल्हापूर, सातारा, सांगली परिसरातून मुंबईच्या दिशेने वाहनांची वर्दळ कायमस्वरूपी वाढत आहे. त्यातच उतारावर वाहन चालकांचे सुटणारे नियंत्रण, ब्रेक फेल होण्याच्या घटनांमुळे अपघांताच्या संख्येत वाढ झाली आहे. बेशिस्त वाहन चालकांमुळे सलग १० ते १२ वाहनांना धडक देण्यापासून ते मोटारीला आग लागून तडफडत मरणार्या नागरिकांचे जीव स्वस्त झाले आहेत, अशीच स्थिती आता पाहायला मिळत आहे. कारण नवले पुलानजीक होणार्या अपघातांमुळे प्रशासन, शासन अन नागरिक हतबल झाले आहेत. तीव्र उतार, वाहतूक नियमांचे होणारे उल्लंघन, आरटीओ नियमांचे उल्लंघन, मुदतबाह्य अजवड वाहनांद्वारे होणारी वाहतूक, बेशिस्त वाहन चालक अपघातास कारणीभूत असल्याचे अनेकदा तपासात उघडकीस आले आहे. मात्र, त्याबाबतीत काहीच दिवस चर्चा होउन पुन्हा जैसे थे परिस्थिती तयार होत आहे.
अपघातानंतर मंत्र्यापासून संबंधित सर्व प्रशासनाची घटनास्थळी दिली जाणारी धडक काही दिवसांत गायब होत आहे. त्यानंतर वाहन चालकांचा बेशिस्तपणा आणि नियमांचे उल्लंघन सातत्याने घडत आहे. त्यामुळेच अपघाताला जणूकाही निमंत्रणच दिले जात आहे की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. दिवसेंदिवस नवले पुल परिसरातील अपघातांचे प्रमाण वाढीस लागल्यामुळे परिसरातून दुचाकीस्वार, मोटार चालक, पीएमपीएल चालकांच्या मनातील भीतीचे काहूर वाढीस लागले आहे. अशा अपघांमुळे शापित नवले पुल की भुताटकी अशीही चर्चा आता नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे. मागील काही वर्षांत नवले पुलावरील अपघातांमुळे परिसरातील रहिवाशांनीही दुसरीकडे राहायला जाणे पसंत केले आहे. पुल परिसरातून प्रवास करणे म्हणजे मृत्यूलाच निमंत्रण देण्यासारखेच आहे, अशी प्रतिक्रिया संबंधित वाहन चालकांकडून दिली जात आहे. त्यामुळे हे अपघातांचे सत्र बदलण्यासाठी शासन आणि प्रशासनाने युद्ध पातळीवर उपाययोजना राबविणे अत्यावश्यक बनले आहे.
नवले पुलावरील अपघातांच्या अभ्यासाचे काय झाले
नवले पुल परिसरात २० नोव्हेंबर २०२२ रोजी मोठा अपघात झाला होता. त्या रात्री प्रवासादरम्यान पाठोपाठ तीन अपघात झाले होते. कर्नाटकातून तांदूळ घेऊन मुंबईकडे जाणार्या ट्रकने तब्बल ४८ वाहनांना उडवले होते. संबंधित भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दिल्लीतील पथकाने धाव घेतली होती. पथकानेन अपघातांचा शास्त्रीय दुष्ट्या अभ्यास करीत दीर्घ कालावधीसाठी करावयाच्या उपाययोजना सुचाविल्या होत्या. त्याचे पुढे झाले काय, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
२२ सुचनांचे पालन करणार कोण
दरी पुल आणि नवले पुलावर अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने २२ प्रकारच्या उपाययोजना केल्या होत्या. त्यामध्ये खेड शिवापूरमधील टोल नाक्यावर जड वाहनांनाठी चेक पोस्ट उभारले होते. तसेच अतिरीक्त स्पिड गन आणि सूचना फलकही लावण्यात आले होते. परिसरात स्पीड गन, रंम्बलर, पिवळे पट्टे, सूचना फलक लावले गेले होते. या सर्व उपाययोजना करुनही पुन्हा मोठा अपघात घडत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
डिझेल वाचवण्यासाठी वाहने केली जातायेत न्युट्रल
कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रीज दरम्यान ८ किलोमीटरचा उतार आहे. संबंधित उतारावर ट्रकसारखे जड वाहन बंद केल्यास ३ लीटर इंधन वाचते. त्यामुळे ट्रक चालक सर्रात वाहन बंद करुन न्युट्रल गिअरवर वाहने चालवतात. त्यातच महामार्गाच्या आजूबाजूला स्थानिक रहिवाशांना बाहेर निघण्यासाठी रस्ते ठेवले आहेत. त्यामुळे अचानक वाहन महार्गावर आल्यास ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून अपघात असल्याचे निदर्शनात आले होते. दुसरीकडे वाहन न्युट्रलवर असल्यास त्याचा तातडीने ब्रेक लागत नसल्यामुळे अपघात घडत आहेत.























