सहप्रवासी १२ वर्षीय मुलगा ठार, मध्यवर्ती डीपी रस्त्यावर घडला अपघात
marathinews24.com
पुणे – भरधाव वाहन चालकाने दुचाकीस्वार महिलेला दिलेल्या धडकेत तिच्या पाठीमागे बसलेला १२ वर्षीय मुलगा ठार झाला आहे. तर दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात १९ मे रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास कोथरूडमधील शांतीबन चौक ते आशिष गार्डन चौकादरम्यान, डीपी रोडवर घडला आहे. याप्रकरणी अज्ञात मोटार चालकाविरूद्ध कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोधमोहिम सुरू केली आहे.
पुण्यात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद; वेगवेगळ्या घटनेत १९ लाखांचा ऐवज चोरी – सविस्तर बातमी
अबीर प्रणव पानसे (वय १२ रा. रामबाग कॉलनी, कोथरूड) असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. प्रियंका प्रणव पानसे (वय ४४ रा. अमेय अपार्टमेंट, रामबाग कॉलनी कोथरूड) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रियंकाचा मुलगा अबीर हा ड्राईंगच्या क्लास सुटल्यानंतर आईसोबत दुचाकीवरून घरी येत होता. १९ मे रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास पानसे माय-लेक दुचाकीवरून घरी जात असताना, शांतीबन चौक ते आशिष गार्डन चौकादरम्यान, डीपी रोडवर भरधाव मोटार चालकाने त्यांना पाठीमागून धडक दिली. त्यामुळे दोघेही माय-लेक रस्त्यावर खाली पडले. अपघातात प्रियंकासह अबीर गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान अबीरचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संदीप पवार तपास करीत आहेत.
इनोव्हाची धडक, १३ वर्षीय मुलगा ठारची घटना ताजी
इनोव्हा चालकाने दिलेल्या धडकेत १३ वर्षीय मुलगा ठार झाल्याची घटना रविवारी दि. १८ संध्याकाळी सहाच्या सुमारास कोंढवा बुद्रुक गावठाणमधील भोलेनाथ चौकात घडली होती. इनोव्हा कार चालकाने (एमएच ३१ सीए ५८८८) दिलेल्या जोरदार धडकेत निवृत्ती बाजीराव किसवे (वय १३) हा अल्पवयीन मुलाचा गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. चालक जैद नसीर शेख (वय २३, रा. भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द) याला पोलिसांनी अटक केली आहे.