२ लाखांचा विमा मंजूर करून घेतला, तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – अपघात झाला नसताना तरूणाने विमा कंपनीला खोटी माहिती देऊन २ लाख रुपयांचा वैद्यकीय उपचार विमा मंजूर करुन घेतला आहे. फसवणूक केल्याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. अपस्माराच्या (फिट) विकाराने ग्रस्त असताना अपघात झाल्याची बतावणी, बनावट कागदपत्रे तयार करुन फसवूणक केल्याचे चौकशीत उघड झाले. महेंद्र अनिल कवडे (वय ३६. रा. बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक भीमराव मांजरे यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बसप्रवासात जेष्ठ महिलेचे सोन्याचे कडे चोरीला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कवडेचा अपघात झाला असून, ते जखमी झाल्याचे सांंगत त्यांना वानवडीतील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयाला खोटी माहिती देऊन बनावट कागदपत्रे सादर केली. त्यानंतर संबंधित कागदपत्रे वीमा कंपनीत सादर केली होती. आरोपीने विमा कंपनीकडून २ लाख ३ हजार ६९९ रुपयांचा वैद्यकीय उपचार विमा मंजूर करुन घेतला. दरम्यान, कवडेने त्याचवेळी पत्नी आणि मेहुण्याने मारहाण केल्याची फिर्याद मुंढवा पोलीस ठाण्यात केली होती. प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक भीमराव मांजरे यांनी केला होता. चौकशीत कवडे यांना फिटचा त्रास असून, फिट आल्याने ते पडल्याने जखमी झाल्याची माहिती मिळाली होती.
वैद्यकीय उपचार विम्याचे पैसे मिळवण्यासाठी कवडेने रुग्णालयाकडे बतावणी केली होती. कवडे यांचे पत्नीबरोबर वाद असल्यामुळे त्यांना त्रास देण्यासाठी तक्रार दाखल केली. पत्नी आणि मेहुण्याने मारहाण केल्याने जखमी झाल्याची फिर्याद दिली होती. कवडे यांनी वैयक्तिक स्वार्थ, तसेच आर्थिक लाभ मिळवण्यासाठी पोलिसांची दिशाभूल केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब टापरे तपास करत आहेत.