पुणे रेल्वे स्टेशनसह ३ ठिकाणी बीडीडीएस पथकाकडून तपासणी
marathinews24.com
पुणे – रेल्वे स्टेशन, भोसरी आणि चैतन्य महिला मंडळ येथे बॉम्बस्फोट करणार असल्याचा कॉल पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बुधवारी (दि. २०) आला होता. त्यामुळे संपूर्ण पोलिस यंत्रणा सतर्क झाली होती. बॉम्बस्फोटाच्या धमकीने खळबळ उडाल्यानंतर तात्काळ रेल्वे स्टेशन परिसरासह संबंधित ठिकाणी पोलिस, बीडीडीएस आणि श्वान पथकाने तपासणी करून परिसर पिंजून काढला. प्राथमिक तपासात हा फोन खोडसाळपणाचा प्रकार असल्याचा संशय असून पोलीस कॉलरचा शोध घेत आहेत.
कुख्यात गजानन मारणेचा जामीन अर्ज फेटाळला – सविस्तर बातमी
पुणे नियंत्रण कक्षात बुधवारी ( दि. २१ ) रात्री रात्री एक निनावी कॉल आला होता. संबंधिताने पुणे रेल्वे स्टेशन, भोसरी आणि येरवड्यातील चैतन्य महिला मंडळ येथे स्फोट घडवून आणण्यात येणार आहे. कॉलरने एवढी।माहिती देऊन फोन बंद केला होता. या माहितीची गंभीर दखल घेत नियंत्रण कक्षाने संबंधित ठिकाणच्या पोलीस ठाण्यांना तत्काळ सूचित केले. यानंतर स्थानिक पोलिस, बॉम्ब शोध पथक आणि श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले.
बंडगार्डन पोलिसांकडून पुणे रेल्वे स्टेशन परिसरात तपासणी केली. यादरम्यान निनावी कॉल करणार्या व्यक्तीचा नंबर त्वरित ट्रेस करण्यात आला. त्या क्रमांकाचे विश्लेषण करता तो एक महिलेच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले. संबंधित मोबाईल उल्हासनगर-कुर्ला प्रवासात हरवल्याचे समोर आले. महिलेचा फोन घेवून कोणीतरी दुसर्याने हा खोडसाळपणा केल्याचा संशय पोलिसांना आहे. संबधीत कॉलरचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड यांनी दिली आहे.