डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‘सुरक्षित स्मार्टफोन मार्गदर्शक’ पुस्तकाचे प्रकाशन
marathinews24.com
पुणे – डिजिटल युगात स्मार्ट फोन केवळ संवादाचे साधन नसून आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनासाठी गरजेचे माध्यम आहे. हे उपकरण कामासाठी जरूर वापरा; परंतु त्याचा अतिवापर टाळा. मानवी नातेसंबंधांतील आनंद वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा जरूर वापर करा; परंतु ई-नातेसंबंधांचे मानवी ऋणानुबंधात रुपांतर करणे टाळा, असा सल्ला पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी दिला.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने कौशल्य स्पर्धेचे आयोजन – सविस्तर बातमी
ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‘सुरक्षित स्मार्टफोन मार्गदर्शक’ या ६४व्या पुस्तकाचे प्रकाशन आज (दि. ११) डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. डॉ. भटकर यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून मल्टीव्हर्सिटी, आय-स्पेस, बावधन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रकाशक सु. वा. जोशी, निलिमा जोशी वाडेकर उपस्थित होते.
डॉ. विजय भटकर म्हणाले, आपले आर्थिक व्यवहार, कामाचे दस्तावेज यासह अनेक खासगी आठवणी आपण स्मार्ट फोनमध्ये साठविलेल्या असतात. त्यामुळेच आपल्या स्मार्टफोनचे संरक्षण आपणच करणे ही मुलभूत गरज आहे. ‘सुरक्षित स्मार्टफोन मार्गदर्शक’ या पुस्तकात स्मार्ट फोन सुरक्षेच्या अनेक सूचना केल्या आहेत. ज्या योगे स्मार्टफोनधारक नेहमीच जागरूक व सावध राहतील.
लेखनाविषयी बोलताना डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, आजचे युग हे स्मार्ट फोनचे आहे. तंत्रज्ञान जसजसे प्रगती करत आहे, तसतसे स्मार्ट फोन अधिकाधिक वैशिष्ट्यपूर्ण बनत आहेत. अशा काळात स्मार्टफोन वापरकर्त्यांची जबाबदारी महत्त्वाची आहे. स्मार्टफोन वापरून गुन्हेगार अनेक सायबर गुन्हे करत असून त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, ज्यात सुशिक्षितच नव्हे तर उच्चशिक्षित वर्गही बळी पडत आहे. या विषयी जागरुकता निर्माण व्हावी म्हणून या पुस्तकाचे लिखाण केले आहे. यात मोबाईल फोन, माबोईल ॲप्स, मोबाईल फोन सुरक्षा, ऑनलाईन जुगार, डिजिटल ॲरेस्ट आणि डिजिटल युग २०२६++ अशा अनेकविध विषयांवर सविस्तर माहिती उपलब्ध आहे.



















