पुण्यात दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणांचा बेदरकारपणा अंगलट

उड्डाणपुलाच्या कठड्याला भरधाव दुचाकी आदळली, दोघेही ठार

Marathinews24.com

पुणे- उड्डाणपुलाच्या कठड्यावर भरधाव दुचाकी आदळून दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणासह सहप्रवासी मित्राचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली आहे. पौड फाटा चौकात हा अपघात घडला आहे.

दुचाकीस्वार सर्वेश गोपाळ पाटील (वय २०), सहप्रवासी पुष्कर सुधाकर चौधरी (वय १९, दोघे रा. तुरक गुऱ्हाडा, जि. बऱ्हानपुर, मध्य प्रदेश) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. पोलीस हवालदार निषाद कोंडे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मॉर्निंग वॉक करणाऱ्याला कार चालकाने उडवले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार सर्वेश आणि त्याचा मित्र पुष्कर हे सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास पौड रस्त्याने जात होते. त्यावेळी पौड फाटा चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाच्या कठड्यावर भरधाव दुचाकी आदळली. अपघातात दुचाकीस्वार सर्वेश आणि त्याचा मित्र पुष्कर यांना गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला.

पौड फाटा चौक, मृत्यूचा सापळा बनतोय

पौड उड्डाणपुलावर भरधाव दुचाकी कठड्याला आदळून दुचाकीस्वार तरुणांचा मृत्यू झाल्याच्या घटना यापुर्वी घडल्या आहेत. उड्डाणपुलावर झालेले बहुतांश अपघात भरधाव वेगामुळे झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कर्वे रस्त्यावर गंभीर स्वरुपाच्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. कर्वे रस्ता कायम गजबजलेला असतो. दिवसा, तसेच रात्रीही रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. १३ फेब्रुवारीला कर्वे रस्त्यावर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अपघातात केशव बाबूराव मुंगे (वय ५१, रा. कुदळे पाटील आंगण, वडगाव बुद्रुक) यांचा मृत्यू झाला होता. कर्वे रस्त्यावर गेल्या वर्षी कोथरूड बसस्थानक परिसरात रस्ता ओलांडणारी तरुणी आरती सुरेश मनवाने हिचा भरधाव डंपरच्या धडकेत मृत्यू झाला होता. रसशाळा चौकात निवृत्त कृषी अधिकारी सुनील भास्करराव देशमुख यांचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाला होता. याच चौकात गेल्या वर्षी जूनमध्ये जलसंपदा विभागातील निवृत्त अधिकारी कृष्णा गणपती देवळी यांचा अपघातात मृत्यू झाला होता. सप्टेंबर महिन्यात रात्री नऊच्या सुमारास मद्याच्या नशेत असलेल्या टेम्पोचालकाने सहा वाहनांना धडक दिल्याची घटना घडली होती. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी गीतांजली श्रीकांत अमराळे यांचा मृत्यू झाला होता.

अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वेश आणि पुष्कर हे दोघे महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत, अशी माहिती कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी दिली. भरधाव दुचाकी चालवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक राजकुमार अडागळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top