बनावट कागदपत्रे सादर करणे भोवले, समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा
marathinews24.com
पुणे – बनावट कागदपत्रे सादर करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते (अजित पवार गट ) दीपक मानकर यांच्या विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आता त्यांचा मुलगा करण मानकर आणि व्याही सुखेन शहा यांच्याविरूद्धही समर्थ पोलीस ठाण्यात दोन स्वंतत्र गुन्हे दाखल केले आहेत. बलात्कारातील आरोपी शंतनू कुकडेसोबतचे असलेले कोट्यावधींचे आर्थिक व्यवहार लपविल्याप्रकरणी आणि पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी मानकरसह इतरांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
ताेतया वकील महिलेने उकळली ६ लाखांची खंडणी – सविस्तर बातमी
विदेशी तरूणीला आश्रय देण्याच्या बहाण्याने तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याप्रकरणी शंतनु कुकडे याच्यावर गुन्हा दाखल आहे. त्याच्या बँक खात्यात तब्बल १०० कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते. कुकडेचा निकटवर्तीय रौनक जैन याच्या बँक खात्यातून मानकर पिता-पुत्रांच्या बँक खात्यात कोट्यावधी रूपये वर्ग केले आहेत.
त्याअनुषंगाने पुणे पोलिसांनी मानकर यांची नुकतीच चौकशी केली होती. मानकर यांनी कुकडेसोबत कोणतेही आर्थिक व्यवहार झाले नसल्याचे सांगत कागदपत्रे सादर केली होती. पोलिसांनी कागदपत्रांची सत्यता तपासली असता, कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आले आहे. पोलिसांची दिशाभूल करणे, आरोपी कुकडेसोबत कोट्यावधींचे व्यवहार दीपक मानकर यांनी केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार समर्थ पोलिसांनी मानकरविरुद्ध फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आर्थिंक व्यवहार लपविण्यासाठी बनावट कागदपत्रांद्वारे करण मानकर यानेही पोलिसांनी दिशाभूल केली आहे. त्यांच्याही बँक खात्यात ५० लाख रूपये वर्ग झाले आहेत. याप्रकरणी शंतनू कुकडे, करण मानकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दुसर्या गुन्ह्यात शंतनू कुकडे, सुखेन सुरेशचंद्र शहा, रौनक शहा, याच्यासह इतरांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी कुकडे याने दीपक मानकर यांचे व्याही सुखेन शहा याच्या बँकखात्यात तब्बल ६ कोटी ५२ लाख रूपये वर्ग केले होते. संबंधित गुंतवणूक रिसोर्ट उभारणीसाठी असल्याचा जबाब त्यांनी पोलिसांनी दिला होता.
दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी बनावट स्टॅम्प पेपरद्वारे बनावट दस्त करून शासनाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. यापुर्वी आरोपी शंतनू कुकडेवर समर्थ ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. अशातच कुकडेच्या बँक खात्यात कोट्यावधी रूपयांच्या व्यवहाराची पोलिसांकडून तपासाला गती देण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेऊन आहेत.