पोलिसांची धक्कादायक माहिती, नियमबाह्य वर्ग चालविणारे पोलिसांच्या रडारवर
Marathinews24.com
पुणे – स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासचालक-मालकच स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आंदोलनास प्रवृत्त करीत असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात उघडकीस आली आहे. त्यापार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून संबंधित कोचिंग क्लास चालकांविरूद्ध कठोर कारवाई करण्याची हालचाल सुरु केली आहे. त्याअनुषंगाने महापालिकेसह पोलिसांनी संबंधितांना रडारवर घेतले असून, आता त्यांची चौकशी केली जाणार आहे. नियमबाह्य कोचिंग क्लासविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
पुण्यातील मध्यवर्ती भागात स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणार्या हजारो विद्यार्थ्यांना कोचिंग क्लास चालकांकडून धडे दिले जातात. प्रत्यक्षात मात्र, स्वतःच्या आर्थिंक फायद्यासाठी बहुतांश क्लास चालकांकडून चक्क विद्यार्थ्यांनाच आंदोलन करण्यासाठी पुढे केले जात आहे. परिक्षा पुढे ढकला, एमपीएससी, युपीएससी आयोगाच्या विविध धोरणात्मक निर्णयाबाबत टीका करण्यास भाग पाडले जात आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांकडून वारंवार आंदोलन करीत नागरिकांसह पोलिसांना वेठीस धरले जात आहे. प्रामुख्याने दोन ते तीन महिने परिक्षा लांबणीवर पडल्यास खासगी क्लासचालक-मालक आर्थिकदृष्ट्या मालामाल होत आहेत. पोलीस तपासादरम्यान काही कोचिंग क्लास चालक हे मुद्दामहून विद्यार्थ्यांकडून आंदोलन करुन घेत असल्याचे उघडकीस आले आहे.
खाजगी कोचिंग चालकांची होणार झाडाझडती
स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांच्या आडून खासगी कोचिंग क्लासचालक स्वार्थ साधून घेत आहेत. त्यापार्श्वभूमीवर संबंधितांनी क्लास सुरू करण्याआधी महापालिकेसह, अग्निशमक दल, स्थानिक पोलीस, जागा मालक परवानगीसह विविध अटींची पुर्तता केली आहे का, याची चौकशी पोलीस करणार आहेत. नियमबाह्य कोचिंग करणार्या संस्था चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला जाणार आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वी नवी दिल्लीत खासगी कोचिंग क्लासमध्ये पाणी शिरून विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्याचअनुषंगाने पोलिसांकडून कोचिंग क्लासचालकांना धारेवर धरले जाणार आहे. विविध परवानगी नसल्यास संबंधितांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
पुण्यातील काही स्पर्धा परिक्षा क्लास चालकांकडून विविध नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून आले आहे. प्रामुख्याने स्पर्धा परिक्षा करणार्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता न घेणे, अग्निशमक दल, महापालिका, स्थानिक पोलिसांची परवानगी नसणे, यासह विविध परवानगीची तपासणी मोहिम आम्ही सुरू केली आहे. नियमबाह्य क्लासचालकांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर