खेड तालुक्यातील घटना, पसार आरोपीला पोलीसांनी केले गजाआड
Marathinews24.com
पुणे – अत्याचाराला विरोध केल्यामुळे रागावलेल्या आरोपीने महाविद्यालयीन तरुणीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खून करून पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. तरुणीला दुचाकीवरून सोडण्याची बतावणी करून आरोपीने तिला नदीपात्रात नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने त्याला विरोध केल्यानंतर आरोपी तिच्या डोक्यात दगड घालून पसार झाला होता. ही घटना खेड तालुक्यातील मांजरेवाडीत घडली होती.
जिथे केला हल्ला तिथेच काढली पोलिसांनी धिंड सविस्तर बातमी
नवनाथ मांजरे (वय २९) असे अटक केलेल्याचे आरोपीचे नाव आहे. त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने 9 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती खेड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी राजगुरूनगर भागातील एका महाविद्यालयात अकरावीत होती. ती शुक्रवारी (११ एप्रिल) सकाळी नेहमीप्रमाणे महाविद्यालयात गेली होती. महाविद्यालयातून सकाळी अकराच्या सुमारास ती घरी निघाली होती. त्यावेळी आरोपी मांजरे दुचाकीवरून आला. त्याने तिला दुचाकीवरून घरी सोडतो, असे सांगितले. त्यानंतर तिला दुचाकीवरून घेऊन तो निघाला. शेताला पाणी द्यायचे आहे, असे सांगून त्याने तरुणीला मांजरेवाडी पिंपळ-मलघेवाडीतील नदीकाठी असलेल्या उसाच्या शेतात नेले. तेथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
तरुणीने त्याला विरोध केल्यानंतर त्याने तिच्या डोक्यात दगड मारून तिचा मृतदेह १५० फूट ओढत नेऊन भीमा नदीपात्रात टाकला. खून केल्यानंतर आरोपी मांजरे गावात आला. तो जऊळके गावातील यात्रेला गेला होता. श्री हनुमान जन्मोत्सव शनिवारी (१२ एप्रिल) होता. आरोपीच्या कुटुंबीयांचे गावात दुकान आहे. आरोपी मांजरे गावातील दुकानात नारळ विक्री करत होता. ‘माझ्या शेताजवळ एका महिलेचा ओरडण्याचा आवाज आला आहे. मी घाबरून तिकडे गेलो नाही,’ अशी बतावणी त्याने गावात केली होती. महाविद्यालयीन तरुणी बेपत्ता झाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, सहायक निरीक्षक स्नेहल राजे आणि पथकाने तपास सुरू केला. तपासात मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मांजरे याला संशयावरून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने युवतीचा खून केल्याची कबुली दिली.
बहिणीच्या साखरपुड्यापूर्वी झाला खून
महाविद्यालयीन तरुणीच्या बहिणीचा रविवारी (१३ एप्रिल) साखरपुडा होता. साखरपुडा असल्याने कुटुंबीय तयारीत होते. घरात आनंदाचे वातावरण होते. तरुणीचा खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर गावात शोककळा पसरली. खून करणारा आरोपी मांजरे याला कठोर शिक्षा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. शोकाकुल वातावरणात युवतीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.