लष्कर, स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
marathinews24.com
पुणे – व्यावसायिकांना धमकावून खंडणी मागण्याचे प्रकार वाढीस लागले असून, याप्रकरणी स्थानिक पोलिसांकडून कारवाईच केली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांत पुण्यातील लष्कर, स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्यावसायिकांना सराईतांनी धमकावून खंडणी मागितल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोक्का कारवाईनंतर गुंगारा, तीन महिन्यांनी सराइताला अटक – सविस्तर बातमी
सराईताने लष्कर भागातील दुकानदाराला धमकावून त्याच्याकडे दरमहा हप्ता मागितल्याचे उघडकीस आले आहे. सेंटर स्ट्रीट परिसरात दुकानदाराला धमकावून त्याच्यकडून १५ हजार ८०० रुपयांची खंडणी उकळली. याप्रकरणी सराइताला अटक करण्यात आली आहे. अरबाज मैनुद्दीन कुरेशी (वय २८, रा. भीमपूरा, लष्कर आणि राजेवाडी, नाना पेठ ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत व्यावसायिकाने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे लष्कर भागातील सेंटर स्ट्रीट परिसरात दुकान आहे. आरोपी कुरेशीने त्यांना दरमहा हप्ता देण्याची मागणी करुन धमकाविले होते. या भागात व्यवसाय करायचा असेल तर दरमहा हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी त्याने दिली होती. व्यावसायिकाला जिवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडील १५ हजार ८०० रुपयांची रोकड कुरेशीने लुटली होती. कुरेशीच्या धमकीमुळे घाबरलेल्या व्यावसायिकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक तरटे तपास करत आहेत.
स्वारगेट भागात मसाला दूध विक्री करणार्या तरुणाला गजाने मारहाण करुन त्याच्याकडे सराइताने हप्ता मागितल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी मंगेश पोकळे (वय ४०, रा. धायरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तरुणाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण गुरुवार पेठेतील खडकमाळ आळी परिसरात राहायला आहे. तरुणाने स्वारगेट भागातील नटराज हॉटेलजवळ जय गणेश मसाला दूध विक्रीची गाडी लावली आहे. २७ एप्रिलला रात्री आरोपी पोकळे तेथे आला. मी धायरीतील मोठा गुंड आहे.
या भागात व्यवसाय करायचा असेल तर दरमहा हप्ता दे, अशी मागणी केली. तरुणाला गजाने मारहाण केली. मारहाणीत तरुण जखमी झाला. मारहाण करीत खंडणी मागितल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीसन निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आलाटे तपास करत आहेत.
व्यावसायिकांमध्ये घबराट, पोलिसांनी कारवाईची करण्याची मागणी
व्यावसायिकांना धमकावून स्थानिक गुंड लुटमार करीत असल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही व्यवसाय कसा करायचा, सांगा कोणाला पैसे द्यायचे, कोरोनानंतर व्यवसाय पुर्णतः डुबले आहेत. अशास्थितीत खंडणीखोरांकडून छुप्या पद्धतीने आम्हाला त्रास दिला जात आहे. त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी व्यावसायिकांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली आहे.