मृतदेह मोटारीत सोडून आरोपी पसार, पोलिसांकडून शोध सुरू
Marathinews24.com
पुणे – कसण्यासाठी दिलेल्या जमिनीच्या वादासह सोन्याचे दागिने आपल्याला मिळावे, या लालसेने एकाने जेष्ठ नागरिक शेतकर्याचा खून केल्याची घटना ११ एप्रिलला सांगरुन (ता.हवेली) गावात घडली आहे. त्यानंतर त्यांचा मृतदेह गाडीतच ठेउन संबंधित आरोपी पसार झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके रवाना झाली आहेत. लवकरच आरोपीला ताब्यात घेतले जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
नारायण उर्फ नाना पांडुरंग मानकर (वय ७३ रा. लोकेश सोसायटी, बिबवेवाडी ) असे खून झालेल्या शेतकर्याचे नाव आहे. याप्रकरणी सतीश विठ्ठल खडके (वय ३५ रा. सांगरूण) याच्यावर उत्तमनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नीरज मानकर यांनी फिर्याद दाखल केली आहे.
रिक्षा चालकाकडून महिलेचा विनयभंग – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानकर कुटूंबिय मूळचे हवेलीतील सांगरून गावचे असून, त्याठिकाणी त्यांची शेतजमीन आहे. मात्र, कामानिमित्त ते बिबवेवाडीत राहायला असून, शेतीची कामे करण्यासाठी नानासाहेब ये-जा करीत होते. सतीश खडके हे त्यांची जमीन करीत होते. ११ एप्रिलला नारायण हे बिबवेवाडीतून शेतीच्या कामासाठी मोटारीतून गेले होते. सांगरून गावानजीक ते शेतात संशयितासोबत त्यांनी दिवसभर काम केले होते. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास दागिने चोरीच्या उद्देशाने संबंधित आरोपीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून मोटारीतच खून केला. नारायण यांच्या अंगावरील दागिने काढून घेतल्यानंतर त्यांचा मृतदेह गाडीतच ठेउन आरोपी पसार झाला. दरम्यान, याप्रकरणी १२ एप्रिलला स्थानिकांनी उत्तमनगर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर शेतकर्याचा खून झाल्याचे दिसून आले.
१९ तोळे सोने असल्यामुळे खून झाल्याचा संशय
शेतकर्याकडे दिवसभर काम केल्यानंतर त्यांच्याकडील १९ तोळे सोने लुटून न्यायचे, असा डाव संशयिताने रचला होता. त्यानंतर रात्रीच्या सुमारास जेष्ठावर धारदार शस्त्राने वार करून त्यांना गंभीररित्या जखमी केले. अंगावरील सोने काढून घेतल्यानंतर चोरटा पसार झाला आहे. दरम्यान, संबंधित संशयित चोरटा गावातील असून, त्याच्या शोधासाठी गुन्हे शाखेची पथकेही तपास करीत आहेत. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
शेतकर्याच्या अंगावर असलेल्या दागिन्यांच्या चोरीसाठी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. खून केल्यानंतर आरोपीने त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेत पलायन केले. त्यांचा मृतदेह गाडीत असल्याचे आढळून आले आहे. जेष्ठाच्या गळ्यावर, डोक्यात वार करुन खून केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी आरोपीच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना केली आहे. – मोहन खांदारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उत्तमनगर पोलीस ठाणे