बाणेरच्या अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई, शिवाजीनगर वरिष्ठ पोलीस निरीक्षकाना गिफ्ट
marathinews24.com
पुणे – शहरातील बाणेर आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. एका वरिष्ठाला शिक्षा तर दुसऱ्याला चांगल्या कामगिरीचे गिफ्ट देण्यात आले आहे. तसेच एका महिला पोलीस उपनिरीक्षकालाही बाणेरमधून थेट कोर्ट आवार कंपनीत बदली करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कारवाईने पोलीस खात्यात चर्चेला उधाण आले आहे.
पोलिसांकडे तक्रार दिल्यास मुलगी पळवून नेतो, महिलेला धमकी देणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल – सविस्तर बातमी
बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांना मुदतपूर्व तडकाफडकी हटविण्यात आले आहे. त्यांच्या जागी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील दीड वर्षांपासून त्यांनी शिवाजीनगर पोलीस हद्दीत अतिशय चांगली कामगिरी बजावली असल्याचे गिफ्ट बाणेर पोलीस इंचार्ज म्हणून त्यांना मिळाले असल्याचे बोलले जात आहे. तर मागील अनेक दिवसांपासून साईड ट्रॅक झालेले आणि वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांना पुन्हा एकदा वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बसण्याची लॉटरी लागली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बाणेर ते कोर्ट आवार केली बदली
महिला पोलीस उपनिरीक्षक आर आर पाटील यांची बाणेर पोलीस ठाण्यातुन थेट अडगळीच्या कोर्ट कंपनी आवार याठिकाणी बदली करण्यात आली आहे. पोलीस खात्याअंतर्गत गोपीनियतेचा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. बाणेरमधील एका घटनेप्रकरणी परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांच्याकडे संबंधित महिला पोलीस उपनिरीक्षक यांचा जबाब नोंदविण्यात आला होता. त्यानुसार त्यांची बदली करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव न प्रसिध्द करण्याच्या अटीवर दिली आहे.