दोन महिलांसह साथीदारांनी १५ लाख ७० हजारांना गंडा
marathinews24.com
पुणे – शेअर ट्रेडिंगबरोबरच आयपीएल सट्टा, रेसकोर्सचा व्यवसायामध्ये करोडो रूपयांचा फायद्याचे आमिष दाखवून दोन महिलांसह इतर साथीदारांनी एकाला १५ लाख ७० हजारांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी मंगळवार पेठेतील ३६ वर्षाच्या व्यावसायिकाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पल्लवी गोसावी (वय ३२), त्यांची आई किरण गोसावी (वय ५३, दोघी रा. शिव क्लासिक सोसायटी, मंगळवार पेठ) अर्शद शेख (वय ३८, रा. केडगांव, ता.दौंड) प्रसाद विश्वनाथ कांबळे (वय ३९, रा. नरपतगिरी चौक, सोमवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २४ नोव्हेंबर २०२३ ते १२ मे २०२४ दरम्यान नरपतगिरी चौकातील कार्यालयात घडला.
तब्बल दीड कोटींवर सोन्याची बिस्कीटे चोरणार्याला बेड्या…सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्क्रॅम्प व्हेंडर असून, व्यावसायाच्या निमित्ताने त्यांची पल्लवी गोसावी व तिची आई किरण गोसावी यांच्याशी ओळख झाली. पल्लवी ही फायनान्स कन्सल्टंट असून, तिने तक्रारदाराला शेअर ट्रेडिंगबरोबरच आयपीएल सट्टा, रेसकोर्सचा व्यवसाय आहे. त्यामध्ये करोडो रुपयांचा फायदा होऊ शकतो, असे सांगितले. सुरुवातीला २४ नोव्हेंबर २०२३ रोजी २ लाख रुपये गुंतवणूक करायला सांगितली. डिसेंबर २०२४ पर्यंत गुंतवणुकीवर ३२ लाख रुपये एवढा नफा मिळवून देऊ अशी खोटी आश्वासने, खोट्या भूलथापा, आमिषे दाखवली. त्याला बळी पडून फिर्यादीने नोव्हेबर २०२३ मध्ये ६ लाख रुपये गुंतवणुक केली. २०२४ मध्ये पल्लवी गोसावी हिने त्यांच्याकडून १९ लाख ८० हजार रुपये घेतले. त्या बदल्यात कोणत्याही मेंबरशीप अथवा मोबादला दिलेला नाही. त्यांनी वारंवार विचारणा केल्यावर त्यांना १२ लाखांचा धनादेश दिला. संबंधित धनादेश ८ दिवसांनंतर बँकेत भरा असे सांगितले.
पल्लवीने ६ लाख रुपये तक्रारदाराला परत केले. त्यानंतर ते चेक भरण्यासाठी ते बँकेत जाणार होते. त्यावेळी पल्लवीने त्यांना फोन करून संबंधित चेक ऑगस्टमध्ये जमा करण्यास सांगितले. त्यावेळेस चेकची रक्कम अधिक ४० लाख रोख देते, असे आश्वासन दिले. ऑगस्ट २०२४ मध्ये तक्रारदारला पल्लवीने भेटण्यास टाळाटाळ केली. शेवटी त्यांनी ऑगस्टमध्ये चेक बँकेत भरला. तो चेक न वटता परत आला. त्यानंतर ते पल्लवी हिला भेटण्यास गेले असता तिने त्यांना हकलवून लावले. त्यांच्या कामातील पार्टनर अर्शद शेख याने काम प्रोसेसमध्ये आहे, तुमचे पैसे मिळतील, असे सांगितले. प्रसार कांबळे याने वेळोवेळी फिर्यादींची समक्ष भेटून तो स्वत: पैसे परत देण्यास जबाबदार असल्याचे सांगितले. फिर्यादी यांच्याबरोबरच मंगळवार पेठेतील महिलेची २ लाख ४० हजार रुपयांची अशी एकूण १५ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.