खंडणी विरोधी पथकाकडून आरोपीला कोल्हापुरातून अटक
marathinews24.com
पुणे – चोरीच्या मोबाइलद्वारे महिलेला फोन करून तब्बल १० लाख रूपयांची खंडणी मागणार्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कोल्हापूरातून अटक केली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले दोन मोबाईल व तीन सिमकार्ड जप्त केल्याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त संदीप डोईफोडे यांनी दिली आहे. पार्थ किरण काकडे (वय २३,रा. कुडचे मळा, इचलकरंजी, जि.कोल्हापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो गवंडीकाम करत असल्याचे उघडकीस आले आहे.
पुण्यात बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; २८ लाखांवर बनावट नोटा जप्त – सविस्तर बातमी
खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने आरोपी वापरत असलेले मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केले. उपनिरीक्षक सुनील भदाणे, सुनील कानगुडे यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी कोल्हापूर जिल्हयातील इचलकरंजी गाठले. तांत्रिक विश्लेषण करुन पोलीसांनी पार्थ काकडे व ऋषिकेश वराळे यांचे नाव निष्पन्न केले. त्यानुसार पार्थ काकडे यास कामगार वसाहत इचलकरंजी येथून ताब्यात घेवून सखोल चौकशी केली. त्यावेळी त्याने त्याचा मित्र ऋषिकेश वराळे व त्याचे तीन अनोळखी साथीदार यांचेसह रवीकुमार याचे मोबाईलवरुन तक्रारदार यांना खंडणीसाठी कॉल केल्याचे सांगितले. आरोपींना पुढील तपासकामी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले आहे.