तरुणाच्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश
marathinews24.com
पुणे – बेवारस अवस्थेत सापडलेल्या तरुणाच्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली आहे. कात्रजमधील निंबाळकरवाडी भागात मृतदेह आढळून आला होता. सद्दाम उर्फ सलमान शेख (वय ३५, रा. निंबाळरकर वाडी, कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विक्रम चैठा रोतिया (वय ३२, रा. निंबाळरकरवाडी, कात्रज) याला अटक करण्यात आली.
प्रवासी युवतीशी अश्लील कृत्य; रिक्षाचालक गजाआड – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्दाम आणि विक्रम हे मजुरी करतात. दोघांनी निंबाळकरवाडीत भाड्याने खोली घेतली होती. दोघांमध्ये हात ऊसने दिलेल्या पैशांवरुन वाद झाले होते.आरोपी सद्दामने विक्रमला मारहाण केली होती. वादातून विक्रमने सद्दाम याला बेदम मारहाण करून त्याचा खून केला. त्यानंतर त्याने त्याचा मृतदेह घराच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत टाकून दिला होता. शनिवारी दुपारी निंबाळकरवाडीतील मोकळ्या जागेत एका तरुणाचा मृतदेह बेवारस अवस्थेत सापडल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटलेली नव्हती. पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात बेवारस अवस्थेत सापडलेला मृतदेह सद्दाम याचा असल्याची माहिती मिळाली. वादातून सद्दाम याचा खून त्याचाबरोबर राहणारा सहकारी विक्रम याने केल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, सहायक निरीक्षक समीर शेंडे, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी आणि तपास पथकाने ही कामगिरी केली.





















