मटण बिर्याणी आणून देणे अंगलट
marathinews24.com
पुणे – मोक्कानुसार कारवाई झाल्यानंतर कुख्यात गुंड गजानन मारणे याला सांगली कारागृहात नेण्यात येत होते. त्यावेळी साताराजवळ पोलीस व्हॅन थांबली असताना, मारणेला व्हॅनमध्येच मटण बिर्याणी खाउ घालणार्या विश्वासू आणि आर्थिंक व्यवहार सांभाळणार्या बाळकृष्ण उर्फ पांड्या लक्ष्मण मोहिते याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने सांगलीतुन अटक केली आहे. त्यामुळे मारणे टोळीचे धाबे दणाणले असून, पुणे पोलिसांच्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या दणक्यामुळे गँगस्टर टोळ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
सुरक्षिततेच्या कारणास्तव गजा मारणे याला ३ मार्चला येरवडा ते सांगली कारागृहात वर्ग केले जात होते. त्यावेळी पुणे पोलिसांच्या चार अमलदारासह सहायक पोलीस निरीक्षकाने खात्याला अशोभनीय वर्तण केले. प्रवासाची माहिती मारणे टोळीला दिल्याने ८० ते १०० जणांनी विविध मोटारीतून पोलीस व्हॅनचा पाठलाग केला. त्यानंतर पोलीस ढाब्यावर जेवण करण्यासाठी थांबले असता, मारणे टोळीचा राईट हँड बाळकृष्ण उर्फ पांड्या मोहिते याने गजाला व्हॅनमध्येच मटण बिर्याणी खाउ घातली. ‘भाऊला मटण बिर्याणी पाहिजे’ असे पोलिसांनी सांगताच, त्यासाठी मोहितेने त्याला बिर्याणी आणून दिली. तो मारणेचा अत्यंत विश्वासू आणि आर्थिक व्यवहार सांभाळणारा ‘राइट हँड’ म्हणून ओळखला जातो. त्याला अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.
मारणेला दिलेली व्हीआयपी ट्रीटमेंट भोवली, पोलीस खात्यातील ५ जण निलंबित
कुख्यात गुंड गजा मारणे याला मटण बिर्याणीसह व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा ठपका सहायक पोलीस निरीक्षक सूरजकुमार राजगुरू, हवालदार महेश बामगुडे, हवालदार सचिन मेमाणे, रूपेश मेमाणे, शिपाई राजेश परदेशी यांच्यावर ठेवण्यात आला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रकराची चौकशी करण्यात आली. त्यावेळी संबंधित अधिकार्यांसह चार अमलदार दोषी असल्याचे दिसून आले. त्यानुसार सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी त्यांना निलंबित केले.