पुणे सह जिल्हा निबंधक कार्यालयाचे विशेष अभियान
marathinews24.com
मुंबई – मानीव अभिहस्तांतरण दस्ताच्या अभिनिर्णयाच्या अनुषंगाने सहकारी गृहरचना संस्थांकडील कागदपत्रांची पूर्व तपासणी तसेच कागदपत्रांसंबंधी संस्थांच्या शंका व अडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण केले जात आहे. या अनुषंगाने महसूल विभागाच्या सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे शहर या कार्यालयामार्फत २७ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत विशेष अभियान आयोजित करण्यात आले असून अभिनिर्णय प्रक्रिया अधिक पारदर्शक व जलद गतीने पूर्ण करण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याचा सहकारी गृहरचना संस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कला अनुभवाने जीवनात येते समृद्धी- खास डॉ. मेधा कुलकर्णी – सविस्तर बातमी
या उपक्रमाचा कालावधी २७ ते ३० सप्टेंबर २०२५ सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० असा असून सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय पुणे शहर, शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय इमारत, पहिला मजला, ५-फायनान्स रोड, फोटोझिंको प्रेसच्या मागे पुणे-४११००१ या कार्यालयात ही सुविधा उपलब्ध असेल.
या कालावधीत प्रतिदिन २५ ते ३० संस्थांची कागदपत्रे तपासण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे संस्थांनी अभियानापूर्वी सह जिल्हा निबंधक पुणे शहर कार्यालयात समक्ष किवा jdr.punecity@gmail.com या ईमेल आयडीवर सहभाग नोंदविणे आणि वेळ आरक्षित करणे आवश्यक आहे. सहभाग नोंदणीसाठी संस्थेचे नाव, पत्ता, सहभागी होणाऱ्या तीन पदाधिकाऱ्यांचे नाव, पदनाम आणि संपर्क क्रमांक कळवावेत. नोंदणीनंतर उपलब्धतेनुसार व संस्थेच्या सोयीनुसार दिनांक व वेळ आरक्षित करुन संस्थेस कळविण्यात येईल.
अभियानाचे स्वरूप, व्याप्ती आणि सोबत आणावयाच्या कागदपत्रांच्या माहितीसाठी तसेच संपूर्ण प्रगटन पाहण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या https://www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘नवीन’ आणि ‘नागरिकांसाठी’ या सदराखाली माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सह जिल्हा निबंधक कार्यालय व दुय्यम निबंधक कार्यालये हवेली क्र.१ ते २७ यांच्याकडे देखील माहिती उपलब्ध असून सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांनी सुरू केलेल्या या सेवेचा जास्तीत जास्त संस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे तसेच सह नोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांनी केले आहे.



















