तिघा सराईतांसह चौघांना समर्थ पोलिसांनी केली अटक
marathinews24.com
पुणे – जुन्या भांडणाच्या कारणावरुन तिघा सराईतांसह टोळक्याने तरूणाचा पाठलाग करून त्याच्यावर कोयत्याने वार केले. त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघा गुंडांसह चार जणांना अटक केली आहे. त्यांच्या दोन साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ३ एप्रिलला मध्यरात्री एकच्या सुमारास समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोची गल्लीत घडली.
पुण्यात दुचाकीस्वार चोरट्यांचा धुडगूस सुरूच, पोलीसही हतबल – सविस्तर बातमी
दानिश आसीफ शेख (वय २०, रा. हार्मेन कॉम्प्लेक्स, भवानी पेठ), सईद अमजदखान पठाण (वय २१, रा. पत्र्याची चाळ, न्यू नाना पेठ), हिदायत शरीफ शेख (वय २८, रा. पत्र्याची चाळ, न्यू नाना पेठ), खालिद खलील कुरेशी (वय १९, रा़ सय्यदनगर, हडपसर) यांना अटक केली. उमर अली गफार शेख (वय २२, रा. मोची गल्ली, ए डी कॅम्प चौक) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमर शेख यांच्यावर ससून हॉस्पिटलमधील इमर्जन्सी वार्डमध्ये उपचार करण्यात येत आहे. पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याची फिर्याद घेतली आहे. खालिद कुरेशी याच्याशी उमर शेख याची ७ महिन्यांपूर्वी भांडणे झाली होती. दोघांनी एकमेकाविरुद्ध तक्रारी दिलेल्या होत्या. उमर हा २३ एप्रिलला मध्यरात्री पाऊण वाजता ए डी कॅम्प चौकात थांबला होता. त्यावेळी खालिद कुरेशी, दानिश शेख, सईद पठाण, हिदायत शेख हे एकत्र होप हॉस्पिटलजवळ उभे होते. खालिदने बोटाने इशारा करुन उमरला बोलावले. त्याकडे उमरने दुलर्क्ष करुन तो सेव्हन लव्ह चौकाकडून संत कबीर चौकात मामा आरीफ मेमन यांना भेटला.
तेथून उमर हा मित्र आश्रफ कुरेशी याच्यासह मोची गल्लीतील घरी जात होता. गल्लीमध्ये खालिद आणि दोघेजण त्यांच्यासमोर आले. खालिदने लोखंडी हत्यार काढल्यामुळे उमर हा मोची गल्लीतील घराकडे पळाला. त्याच्या मागोमाग हल्लेखोर धावत आले. त्यांनी घरासमोर उमरला पकडले. हल्लेखोरांनी हातातील हत्यारे हवेमध्ये फिरवून परिसरामध्ये दहशत निर्माण केली. त्यामुळे गल्लीमध्ये बसलेले लोक पळून गेले. खालीने आज ‘उमर को जिंदा नही रखेंगे, आज कल ये बहुत उड रहा है,’ असे बोलला. त्यातील एकाने ‘आज तू जिंदा नही बचेगा’ असे बोलून उमरवर धारदार हत्याराने वार केला. तो वार वाचविण्यासाठी उमरने हात मध्ये घातला. त्याचा वार मनगटावर लागला. खालिदने उमरच्या डोक्यावर वार केला. उमरचे मामा आरीफ मेमन यांनी खालिदला पकडून उमरला सोडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा खालिदने मामांना मारण्यासाठी हत्यार उगारले. ते पाहून मामाने मोठा भाऊ हैदरअली, शाकीर शेख यांना मोठ्याने आवाज देऊन बोलावले. तेव्हा ते हल्लेखोर पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक फडतरे तपास करीत आहेत.