खंडणी मागितल्यास तक्रार करण्याचे पोलिसांकडून आवाहन
Marathinews24.com
पुणे – शहरातील हडपसर सय्यदनगर भागात दहशत माजविणारा कुख्यात गुंड टिपू पठाण याच्यासह साथीदारांची पोलिसांनी शनिवारी धिंड काढली. टिपू पठाण आणि साथीदाराविरुद्ध महिलेची जमीन बळकाविल्याप्रकरणी नुकताच काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सय्यदनगर भागात रिझवान उर्फ टिपू पठाणची दहशत असून, त्याने एका कार्यक्रमात नोटांची उधळण केल्याची घटना नुकतीच घडली होती. सोशल मीडियावर चित्रफीत व्हायरल केली होती. चित्रफीत प्रसारित केल्याप्रकरणी पठाणसह साथीदारांविरुद्ध पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पठाण आणि साथीदारांनी महिलेची जमीन बळकाविल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. संबंधित महिलेने काळेपडळ पोलिसांकडे तक्रार दिली होती. याप्रकरणी रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण, सद्दाम सलीम पठाण, एजाज युसूफ इनामदार, नदीम बाबर खान यांना अटक केली होती.
वाघोलीतील महिला गंजा विक्रीप्रकरणी एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार – सविस्तर बातमी
पोलिसांनी शनिवारी सायंकाळी पठाण याच्यासह साथीदारांची सय्यदनगर भागात धिंड काढली. पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील आणि पथकाने ही कामगिरी केली. पठाणने नागरिकांना धमकावून खंडणी उकळणे, तसेच जमीन बळकाविल्याचे गुन्हे केल्यास तक्रार करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी केले आहे.
आपल्याला भाईगिरी संपवायची आहे- वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील
नागरिकांना तुम्ही कोणत्याही गुंडाला घाबरू नका. आपल्याला परिसरातील कायमस्वरूपीची भाईगिरी संपवायची आहे. जर तुमची काही तक्रार असल्यास तुम्ही थेट पोलीस ठाण्यात येऊन तुमच्याशी संपर्क साधा.आम्ही संबंधित गुंडाविरुद्ध कठोर कारवाई करू, त्याची अशाच पद्धतीने धिंड काढून तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू. कुठल्याही प्रकारची घाबरण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे पुढे या तक्रार करा आणि गुन्हेगारी संपवण्यासाठी पुढाकार घ्या. असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी उपस्थित नागरिकांना केले आहे