युनीट सहाची कामगिरी
marathinews24.com
पुणे – दरोड्याचा प्रयत्न रोखताना बीट मार्शलवर धारदार हत्याराने वार करून पसार झालेल्या सराईत आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनीट सहाला यश आले आहे. त्याच्याविरूद्ध विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. ही घटना २२ सप्टेंबर २०२४ मध्ये डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. फिरोजखॉ शरीफखां दुल्होत उर्फ मेवाती (वय ३४ रा. झंजाळा, पोस्ट- अंबई, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पुण्यात उपप्रबंधक महिलेला १८ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी
डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रभात चौकीचे मार्शल २२ सप्टेंबर २०२४ मध्ये नाईट पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी सहाजणांच्या टोळक्याने धारदार हत्यारांसह दरोडयासारखा गंभीर गुन्हा करताना बीट मार्शलांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपी फिरोजखाँ याने पोलीस अंमलदाराचे हाताच्या पोटरीवर धारदार हत्याराने वार केला होता. त्यावेळी पोलीस अंमलदाराने स्वसंरक्षणासाठी शासकीय पिस्टलमधुन दोन राउंड आरोपींचे दिशेने फायर केले. त्यावेळी दोन आरोपी जखमी झाल्यानंतर अंधाराचा फायदा घेउन पळून गेले होते. गुन्हयातील एका आरोपीला यापुर्वी गुन्हे शाखेसह डेक्कन पोलिसांनी अटक केली होती. इतर पाच आरोपींना न्यायालयाने फरारी घोषित केले होते.
गुन्हे शाखेच्या युनीट सहाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांना पोलीस अमलदारावर वार करणारा आरोपी नाशिकला येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक राकेश कदम, पोलीस अंमलदार सुहास तांबेकर, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार यांचे पथक नाशिकला रवाना झाले. पथकाने स्थानिक भद्रकाली पोलिसांच्या मदतीने कान्हेरेवाडी, नाशिक येथे सापळा रचून आरोपी फिरोजखॉला ताब्यात घेतले आहे. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ, एसीपी राजेंद्र मुळीक, एपीआय मदन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.