जादा नफ्याचे आमिष पडले भारी
marathinews24.com
पुणे – Cyber Crime : जादा नफ्याचे आमिष एका महिलेला महागात पडले असून, प्रसिद्ध कंपनीत डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून काम करणार्या महिलेची तब्बल १८ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. सायबर चोरट्यांनी तक्रारदार महिलेला तब्बल ६०० टक्के नफा मिळवून देण्याची बतावणी करीत ऑनलाईन गंडा घातला आहे. याप्रकरणी वंदना बाहेती (वय ५१ ) महिलेने पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. बाहेतीचे कुटूंबिय खराडी परिसरातील फॉरेस्ट काउंटीसमोरील ग्रासिया अपार्टमेंटमध्ये राहायला आहेत.
दुचाकीवरून जबरी चोरी करणारे अटकेत, युनीट ४ ची कामगिरी – सविस्तर बातमी
वंदनाचे अॅक्सिस बँकेत खाते असून, तिचा मोबाईल नंबर बँक खात्याशी जोडलेला आहे. ८ मे रोजी तिला अज्ञात नंबरवरून मेसेज आला. मेसेज पाठवणार्या महिलेने स्वतःची ओळख मार्गो पिलिक अशी करून दिली. युरोपमध्ये काम करणारी गुंतवणूक सल्लागार असल्याचे सांगितले. एका मोठ्या गुंतवणूक कंपनीशी संबंधित असून, विशेष योजनेअंतर्गत ६०० टक्के नफा मिळवू शकते, असे आमिष तिने बाहेती यांना दाखविले. त्यानंतर आरोपी मार्गोने वंदनाला एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड केले. ज्यामध्ये १०० हून अधिक लोक जोडले गेले होते. ग्रुपमध्ये प्रत्येकजण गुंतवणुकीतून झालेल्या नफ्याचे स्क्रीनशॉट शेअर करत होते. लवकर पैसे कमविण्यास एकमेकांना प्रोत्साहित करत होते.
वंदनाला दुसर्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्येही अॅड केल्यानंतर तिला एक लिंक पाठवण्यात आली. लिंकवर क्लिक केल्यावर तिला गुगल फॉर्म भरण्यास सांगण्यात आले. त्यावेळेस ११ हजार रुपये जमा करण्याची अट ठेवली. सुरुवातीला वंदनाने ११ हजार रुपये जमा केले. काही वेळातच तिला ११ ८०० रुपये नफा दाखवण्यात आला. यानंतर आरोपी मार्गोने तिला अधिक पैसे जमा करण्यास सांगितले.
अशाप्रकारे, वंदनाने ८ मे ते १३ जून २०२५ दरम्यान वेगवेगळ्या खात्यांद्वारे आणि पेमेंट पद्धतींद्वारे एकूण १७ लाख ९८ हजार ८०५ रुपये जमा केले. हे पैसे आयडीएफसी बँक, बँक ऑफ बडोदा आणि बंधन बँक अशा वेगवेगळ्या बँकांच्या खात्यांमध्ये पाठवले. वंदनाने वेबसाइटवर तिचे खाते तपासले तेव्हा त्यामध्ये सुमारे २ कोटी २१ लाख रुपयांचा नफा दिसून आला. ही रक्कम काढण्याचा प्रयत्न करताच तिची विनंती नाकारली. नंतर आरोपी मार्गोने वंदनाला पैसे काढण्यासाठी ३३ लाख रुपये कमिशन फी भरावी लागेल असे सांगितले. हे ऐकून वंदनाला फसवणुकीचा संशय आला. त्यानंतर तिने खराडी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे.
जेष्ठाला शेअर ट्रेडींगमधील परतावा पडला १३ लाखांना
Cyber Crime : शेअर ट्रेडींगमध्ये जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी जेष्ठाची तब्बल १३ लाख १५ हजारांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. ही घटना १५एप्रिल ते २७ मे कालावधीत एनडीए रस्ता शिवणे परिसरात घडली आहे. याप्रकरणी ७६ वर्षीय जेष्ठाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक व बँकधारक खातेधारकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कुटूंबियासह शिवणे परिसरात राहायला असून, १५ एप्रिलला सायबर चोरट्यांनी त्यांना फोनसह मेसेज केला. शेअर ट्रेडींगमध्ये जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी जेष्ठाचा विश्वास संपादित केला. सुरवातीला काही रक्कम ऑनलाईन वर्ग करीत त्यांचा विश्वास आणखीच दृढ केला. त्यानंतर जेष्ठाने सायबर चोरट्यांनी सांगितल्याप्रमाणे विविध बँक खात्यात तब्बल १३ लाख १५ हजार रूपये ऑनलाईन वर्ग केले. त्यांनी परतावा मागितला असता, सायबर चोरट्यांनी संपर्क बंद केला. त्यानंतर जेष्ठाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार तपास करीत आहेत.
नागरिकांनो सावधान, आमिषाला भुलू नका
Cyber Crime : शेअर मार्केटसह विविध प्रकारच्या आमिषाला बळी पडून शिक्षितासह अशिक्षितही सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकत असल्याचे दिसून आले आहे. प्रामुख्याने मागील काही दिवसांपासून सायबर चोरट्यांनी पेन्शन धारक जेष्ठांना आपले लक्ष्य बनविले असून, विश्वास संपादित करीत ऑनलाईनरित्या लुट केली जात आहे. जादा परताव्याचे आमिष, गिफ्ट, सोशल मीडियावरील व्हिडिओला लाईक्स, कमेंट्स मिळवून देण्यासाठी पैशांचे आमिष सर्वसामान्यांना ऑनलाईन फसवणूकीच्या जाळ्यात अलगद अडकवत आहे. त्यामुळे नागरिकांनो कोणत्याही आमिषाला भुलू नका. आपल्या मोबाइलमधील बँक खात्याचा गोपनीय क्रमांक कोठेही शेअर करू नका, फसवणूकीच्या जाळ्यात स्वतःहून अडकू नका, असे आवाहन पुणे सायबर पोलिसांनी केले आहे.