स्पाइसजेटच्या फ्लाइटमध्ये डाएट कोकच्या कॅनमध्ये आढळले तीक्ष्ण धातूचे तुकडे
marathinews24.com
पुणे – गोवा ते पुणे या स्पाइसजेटच्या फ्लाइट (SG1080 ) मधील प्रवासादरम्यान एक धक्कादायक घटना घडली. पुण्यातील व्यावसायिक अभिजीत भोसले यांना क्रू मेंबरकडून दिलेल्या डाएट कोकच्या कॅनमध्ये धातूचे तीक्ष्ण तुकडे आढळले. या तुकड्यांमुळे त्यांच्या घशाला इजा झाली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या संपूर्ण प्रकरणाबाबत स्पाइसजेट , कोका-कोला सह संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाला गांभीर्याने न घेतल्याची खंत अभिजीत भोसले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
भोसले म्हणाले, “मी विमान प्रवासादरम्यान सॉफ्ट ड्रिंक घेतले. काही घोट घेतल्यानंतर घशात तीव्र वेदना जाणवू लागली व श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. माझे सहप्रवासी महेश गुप्ता आणि राजकुमार अगरवाल यांनी मला मदत केली. पुण्यात उतरल्यावर एअरलाईनने तातडीने रुग्णवाहिका बोलावली आणि मला रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून औषधोपचार केले आणि पुढील उपचारासाठी दोन दिवसांनी परत येण्यास सांगितले.” “डाएट कोकच्या कॅनमध्ये धातूचे तुकडे स्पष्टपणे दिसत होते. आम्ही कॅन हलवून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र फक्त एक लहान तुकडा आमच्या हाती लागला. इतर मोठे तुकडे आकारामुळे बाहेर काढता आले नाहीत. क्रू मेंबरने तो कॅन जबरदस्तीने ताब्यात घेतला आणि तो कचर्यात टाकल्याचे सांगितले.
माझे सहप्रवासी महेश गुप्ता यांनी क्रूसोबत चर्चा करून तो दूषित कॅन आणि त्यात सापडलेले इतर तीक्ष्ण धातूचे तुकडे शासकीय यंत्रणेकडे सुरक्षित ठेवावेत, जेणेकरून पुढील तपासणीसाठी तो पुरावा म्हणून वापरता येईल, अशी मागणी केली होती. मात्र स्पाइसजेटने उलट हा महत्त्वपूर्ण पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. भोसले यांनी स्पाइसजेट, कोका-कोला इंडिया, डीजीसीए, एफएसएसएआय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे वारंवार तक्रारी केल्या. तरीसुद्धा अद्याप कोणतीही ठोस व पारदर्शक कारवाई झालेली नाही.
“ही घटना केवळ माझ्यापुरती मर्यादित नाही तर प्रत्येक प्रवाशासाठी गंभीर धोका निर्माण करणारी आहे. प्रशासनाने तातडीने निष्पक्ष चौकशी करून आवश्यक ती कारवाई करणे अत्यावश्यक आहे. ही घटना केवळ प्रवासी सुरक्षेतील गंभीर त्रुटी नसून अन्न सुरक्षा कायद्याचेही स्पष्ट उल्लंघन आहे. दूषित कॅन जतन करण्याऐवजी स्पाइसजेट क्रूने तो जबरदस्तीने घेतला आणि नष्ट केल्याची शक्यता आहे. त्यामुळे पारदर्शक चौकशीसाठी अडथळा निर्माण झाला आहे. संबंधित दूषित कॅनचे फोटो, त्यातील धातूचे तुकडे, उत्पादनस्थळ, बॅच नंबर व निर्मिती-मुदत माहिती सार्वजनिक करणे गरजेचे आहे.”
अभिजीत भोसले यांनी प्रशासनाकडे मागणी केली की, या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, स्पाइसजेट व कोका-कोलाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, दूषित कॅनच्या संपूर्ण बॅचचे तातडीने रिकॉल करण्यात यावे आणि प्रवासी व सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सुधारणा व उपाययोजना त्वरित लागू करण्यात याव्यात.





















