पुण्यात अल्पवयीनेला वेश्या व्यवसायासाठी विकले बांगलादेशातून आलेल्या मुलीची ३ लाखात सौदा
Marathinews24.com
पुणे – बांगलादेशातून मैत्रिणीसोबत आलेल्या अल्पवयीन मुलीची वेश्या व्यवसायासाठी चक्क ३ लाखांत विक्री केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी सात महिन्यांपुर्वी पुण्यात आली होती. तिच्या मैत्रिणीने भोसरीत काही दिवस आपल्या सोबत ठेवल्यानंतर आठ दिवस पुण्यात फिरवले. त्यानंतर तुळशीबाग परिसरातील खोलीत तिला नेऊन ठेवले. काही दिवसांनी तिची बुधवार पेठेतील कुंटणखान्यात विक्री करून मैत्रिणीने बांगलादेशात पळ काढला. दरम्यान, पीडितेने सुटका करून घेत हडपसर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानंतर हा गुन्हा फरासखाना पोलीस ठाण्यात वर्ग केला. फरासखाना पोलिसांनी महिलेला अटक केली असून, इतरांचा शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी दिली.
खुल्या रस्त्यावर फेकलेले १३ अर्भक, पोलिसांच्या तत्परतेने वाचले प्राण – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी १६ वर्ष ३ महिन्यांची असून, ती सुमय्या नामक मैत्रिणीसोबत बांगलादेशातून पुण्यात आली होती. मैत्रिणीने तिला काही दिवस सोबत ठेवून तिची कुंटणखाण्यात ३ लाखांत विक्री केली. आरोपी महिलेने पीडितेला काही दिवस तुळशीबाग परिसरात रूममध्ये डांबून ठेवले होते. त्याठिकाणी तिला वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले जात होते. पीडितेला आरोपी महिलांनी पोलिसांची धमकी दिली. ‘तू परदेशी नागरिक आहेस, खोलीबाहेर गेलीस तर, पोलिस तुला पकडतील’ असे धमकाविले. मात्र, २ एप्रिलला पीडितेने बुधवार पेठेतून पळ काढला. त्यानंतर ती शहरात घाबरून फिरत होती. अखेर पीडितेने हिंमत करत हडपसर पोलिस ठाणे गाठले. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरासखाना पोलिसांकडे वर्ग केला.
मानवी तस्करीचा प्रकार, चार ते पाचजणांवर गुन्हा
फरासखाना पोलिसांना पीडितेने दिलेल्या माहितीनुसार तिला ज्याठिकाणी डांबून ठेवले होते, तेथील महिलेला अटक केली. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून ४ ते ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, उर्वरीत आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. आरोपींनी आणखी कुणा मुलीची अशाप्रकारे विक्री केली आहे का? याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. घटनेमुळे शहरात मानव तस्करीचे प्रकार होत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.