अपघातात दोन महिलांसह तिघांचा समावेश, मांजरी, नवले ब्रीज, येरवड्यात अपघात
marathinews24.com
पुणे – बेदरकारपणे वाहने चालवून पादचार्यांसह इतर वाहन चालकांचा जीव धोक्यात घातल्याच्या अनेक घटना पुण्यासह उपनगरात दिवसेंदिवस वाढीस लागल्या आहेत. त्यामुळे चाकरमान्यांसह महिला, मुली, जेष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून घराबाहेर पडावे लागत असल्याचे दिसून आले आहे. संबंधित बेशिस्तांविरूद्ध स्थानिक पोलिसांसह वाहतूक विभाग, आरटीओने कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. अन्यथा हे अपघात सत्र कायम असेच सुरू राहणार असल्याचे बोलले जात आहे.
पुण्यात रविवार (दि.४) अपघात वार ठरल्याचे दिसून आले आहे. दिवसभरात दोन महिलांसह तरूणाचा अपघातात मृत्यू झाला आहे. हे अपघात मांजरी हडपसर, कात्रज बायपास, शास्त्रीनगर चौक येरवडा परिसरात घडले आहेत. संबंधित पोलीस ठाण्यात आरोपी चालकांसह अपघाताला कारणीभूत ठरलेल्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पहिल्या अपघातात भरधाव कॉक्रीट मिक्सर चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार सहप्रवाशी महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात ४ मे रोजी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास मांजरी परिसरातील झेड कॉर्नरसमोर घडला आहे. रेणू ब्रम्हशंकर शिवप्रताप पांडे (वय ३८ रा. केशवनगर ) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. कॉक्रीट मिक्सर वाहन चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. ब्रम्हशंकर पांडे (वय ३९) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक गांधले तपास करीत आहेत.
भरधाव ट्रक चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात ४ मे रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वंडर सिटीसमोर कात्रजकडून नवले ब्रीजकडे जाणार्या रस्त्यावर घडला आहे. लहुबाई अश्रूबा वाघमारे (वय ४९ रा. आंबेगाव खुर्द) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची मुलगी प्रियंका राउत (वय ३३) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. लहूबाई वाघमारे या दुचाकीवरून घरी जात होत्या. त्यावेळी ट्रक चालकाने त्यांना पाठीमागून धडक दिली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलीस तपास करीत आहेत.
येरवड्यात बेदरकापणा तरूणाच्या जीवाशी
सुसाट दुचाकी चालविल्यामुळे झालेल्या अपघातात तरूणाला जीव गमवावा लागला आहे. हा अपघात ४ मे रोजी सकाळी सहाच्या सुमारास येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात असलेल्या डॉन बॉस्कोनजीक घडला आहे. निखील खेडकर वय ३० रा. लक्ष्मीनगर, येरवडा असे ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार शामराव ससाणे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दुचाकीस्वार निखील हा ४ मे रोजी सकाळी सहाच्या सुमारास शास्त्रीनगर चौकातून जात होता. त्यावेळी त्याने सुसाट दुचाकी चालवून दुकानाला धडक दिली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक लामखडे तपास करीत आहेत.
पालकांना जाग येणार की नाही
बहुतांश पालकांकडून मुलांचे लाड पुरविण्यासाठी त्याच्या ताब्यात दुचाकीसह मोटार दिले जात आहे. त्यानंतर मित्र-मैत्रिणींसह तारूण्यातील निडरपणा अनेकांना सुसाट वाहन चालविल्यामुळे अंगलट आला आहे. त्यामुळे झालेल्या अपघातात कायमचे अपंगत्व, मृत्यू, नातलगांसह पालकांवर कोसळणारा दुःखाचा डोंगर वाढत चालला आहे. मात्र, असे असतानाही पालकांकडून मुलांचे अतिलाड केले जात असल्याचे दिसून आले आहे.