आत्महत्या की हत्या?… प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी”- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पोलीस प्रशासनाला निर्देश
marathinews24.com
सांगली – इस्लामपूरजवळील विठ्ठलवाडी (ता. वाळवा, जि. सांगली) येथे डॉक्टर शुभांगी वानखडे (वय ४४, रा. मुंबई) यांच्या आत्महत्येप्रकरणी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाबाबत डॉ. गोऱ्हे यांनी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे प्रकरणाची तातडीने व सखोल चौकशी व्हावी, असे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. डॉ. शुभांगी वानखडे यांचा मृतदेह दिनांक २ जुलै २०२५ रोजी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्याच गाडीत संशयास्पदरित्या सापडला. त्यांच्या हातावर आणि गळ्यावर नसा कापल्याच्या गंभीर जखमा आढळून आल्या. ही आत्महत्या आहे की यामागे अन्य कोणती पार्श्वभूमी आहे, हे शोधणे अत्यावश्यक आहे, असे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
महिलेवर बलात्कार प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी-उपसभापती डॉ. नीलम गो-हे – सविस्तर बातमी
त्यांनी मागणी केली आहे की, या प्रकरणाचा तपास भारतीय दंड संहितेच्या व अन्य अनुषंगिक तरतुदी अंतर्गत तातडीने सुरू करण्यात यावा. याशिवाय, आत्महत्येस प्रवृत्त करणे किंवा धमकी देणे यासारखे कोणतेही संकेत मिळाल्यास त्यांचाही तपास करण्यात यावा. डॉ. शुभांगी वानखडे यांच्या मोबाईल फोन, पत्रव्यवहार, सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड्स, ई-मेल्स आणि सोशल मीडियावरील संवाद यांची सखोल तपासणी करून मृत्यूमागील खऱ्या कारणांचा शोध घेण्यात यावा, अशी सूचना करण्यात आली आहे. त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात मानसिक, आर्थिक किंवा सामाजिक दडपण होते का, हेही तपासण्यात यावे.
डॉ. गोऱ्हे यांनी मृत्यूपूर्वी कोणी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा थेट किंवा अप्रत्यक्ष दबाव टाकला होता का, याची शहानिशा करण्याची मागणी केली आहे. तसेच, या प्रकरणात कोणतेही साक्षीदार असतील, तर त्यांना साक्षीदार संरक्षण कायदा २०१८ अंतर्गत संरक्षण द्यावे, असेही त्या म्हणाल्या.या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष, पारदर्शक आणि जलदगतीने व्हावी, अशी ठाम भूमिका विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडली आहे. ही घटना केवळ एका महिला डॉक्टरच्या आत्महत्त्येपुरती मर्यादित न राहता, समाजात अशा दुर्दैवी घटनांना आळा बसण्यासाठी संबंधित यंत्रणांनी गंभीरतेने कार्यवाही करावी, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.