डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ‘शिक्षक दिन’ केला जातो साजरा
marathinews24.com
पुणे : (रेवण कोळेकर) – भारत देशात प्रत्येक वर्षी ५ सप्टेंबर हा दिवस ‘शिक्षक दिन’ (Teachers Day 2025) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारताचे माजी राष्ट्रपती, महान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती असते. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा आहे. शिक्षक हा शब्द जरी उच्चारला तरी प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर आपले मार्गदर्शन करणारे, आपल्याला शिक्षण देणारे, आपले शाळेतील शिक्षक आठवतात.
राज्य महोत्सव; गणेशोत्सव – विशेष लेख – सविस्तर वाचा
शिक्षक हा समाजाचा खरा गुरू आहे. तो विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान देत नाही तर त्यांना योग्य संस्कार, मूल्ये आणि जीवन जगण्याची एक चांगली शिस्त शिकवतो. प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात शिक्षकाचे योगदान अपरिमित असते. एखादा विद्यार्थी गरीब, साध्या कुटुंबातून आलेला असला, तरी त्याच्या अंगी असलेले गुण ओळखून त्याला योग्य मार्ग दाखवणारा शिक्षकचं त्याचे भविष्य उज्ज्वल करू शकतो. म्हणूनच भारतीय संस्कृतीत शिक्षकाला देवापेक्षा अधिक श्रेष्ठ मानले जाते.
आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या काळात कुठलीही माहिती सहज उपलब्ध होते, परंतु माणूस घडविण्याचे सामर्थ्य केवळ शिक्षकातच आहे. इंटरनेटमुळे जगभरातील कुठलंही ज्ञान काही सेकंदात मिळू शकते, पण चारित्र्य, नैतिकता आणि जबाबदारीची जाणीव ही फक्त गुरुजनांच्या शिकवणुकीतूनच येते. एक प्रेरणादायी शब्द, एक चांगला योग्य सल्ला एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्याला नवे वळण देऊ शकते. डॉ. राधाकृष्णन हे स्वतः एक आदर्श शिक्षक होते. त्यांनी आपल्या आयुष्यात सदैव शिक्षणाला सर्वोच्च स्थान दिले होते. ते म्हणायचे, खरे शिक्षक तेच, जे विद्यार्थ्यांमध्ये विचार करण्याची आणि प्रश्न विचारण्याची प्रेरणा जागृत करतात. ही शिकवण आजही आपल्यासाठी तितकीच अधिक महत्त्वाची आहे.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण त्या सर्व गुरुजनांना वंदन करतो, जे आपल्या वैयक्तिक फायद्याचा विचार न करता समाजासाठी ज्ञान देण्याचे कार्य करत असतात. ग्रामीण भागातील लहान शाळेत असो किंवा शहरातील महाविद्यालयात प्रत्येक शिक्षकाचे ध्येय फक्त एकच असते, ते म्हणजे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणे. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी फक्त कष्ट नाही, तर योग्य मार्गदर्शन आवश्यक असते. ही दिशा शिक्षक देतात. आपण कुठंतरी वाचलेच असेल अनेक यशस्वी व्यक्ती ह्या आपल्या प्रवासाचे श्रेय हे त्यांच्या शिक्षकांना देतात. कारण शिक्षकांच्या मार्गदर्शनाशिवाय कोणतीही प्रगती अपुरी असते म्हणावे लागेल.
आजच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या शाळेतील शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे खूप गरजेचे आहे. त्यांच्या शिकवणीचे स्मरण करून, त्यांच्या आदर्शांचे अनुकरण करणे आणि त्यांचा सन्मान राखणे हेच खरे शिक्षक दिन साजरे करण्याचे योग्य ठरेल. शिक्षक दिन आपल्याला हे अधोरेखित करून देतो की, शिक्षक हेच समाजाचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या हातात एका पिढीचे नव्हे तर संपूर्ण राष्ट्राचे भविष्य घडवण्याची ताकद आहे. म्हणूनच त्यांचे कार्य महान आहे आणि त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे.
का साजरा केला जातो शिक्षण दिन?
भारतामध्ये दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन’ (Teachers Day 2025) साजरा केला जातो. शिक्षकांच्या योगदानाला आदराने गौरवण्यासाठी आणि भावी पिढ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञान आणि शिक्षण तज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. भारत सरकारने १९६२ मध्ये डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून घोषित केला.
सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म १८८८ मध्ये झाला. ते एक प्रसिद्ध तत्त्वज्ञ होते आणि त्यांनी भारताचे पहिले उपराष्ट्रपत आणि दुसरे राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला. शिक्षकांनी देशातील सर्वोत्तम बुद्धीमत्ताधारक असावे, असे त्यांचे मत होते. राष्ट्रीय विकासात शिक्षणाच्या महत्त्वावर त्यांनी नेहमी भर दिला. शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ आणि नेते म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानाला आदराने स्मरण करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरात ५ ऑक्टोबर रोजी जागतिक शिक्षक दिन साजरा केला जातो.
आजच्या शिक्षक दिनानिमित्त आपण सर्वांनी एकत्रितपणे “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः” या संस्कृत वचनाचा अर्थ मनात रुजवावा, कारण गुरुशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय जीवन नाही.























