रहिवाशांना धमकी; ६ जण अटकेत
marathinews24.com
पुणे – सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर वाढदिवस साजरा करणाऱ्या टोळक्यास जाब विचारल्याने दहशत माजविल्याची घटना कोथरूड भागात घडली. टोळक्याने जाब विचारणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला शिवीगाळ केली. कोथरूड पोलिसांनी याप्रकरणी ६ जणांना अटक केली असून, एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
एसटी प्रवासी महिलेच्या पिशवीतून ७ लाखांचे दागिने लंपास – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कोथरूडमधील मयूर काॅलनीत असलेल्या एका सोसायटीत राहायला आहेत. सोसायटीच्या परिसरात एक गोदाम आहे. गुरुवारी (९ ऑक्टोबर) रात्री अकराच्या सुमारास गाेदामातील कामगार सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर एकाचा वाढदिवस साजरा करत होते. आरडाओरडा करत असल्याने सोसायटीतील रहिवाशांनी टोळक्याने त्यांना हटकले. प्रवेशद्वारासमोर गोंधळ घालू नका, असे रहिवाशांनी त्यांना सांगितले. त्यावेळी टोळक्यातील एकाने त्याच्याकडील तीक्ष्ण शस्त्र उगारुन दहशत माजविली. सोसायटीतील नागरिकांना शिवीगाळ केली. घटनेची माहिती तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाने त्वरीत पोलिसांना दिली.
पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या टोळक्यातील ६ जणांसह एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक करिश्मा शेख यांनी दिली. उपनिरीक्षक शेख प्रकरणाचा तपास करत आहेत.





















