जालिंदरनगर आणि वाबळेवाडीच्या शैक्षणिक पॅटर्नची राज्यात अंमलबजावणी करणार- मंत्री दादाजी भुसे

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांचा सन्मान

marathinews24.com

पुणे – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालिंदरनगर (कनेरसर) (ता.खेड) आणि वाबळेवाडी (ता. शिरुर) शाळेत राबविण्यात येणारे नाविन्यपूर्ण उपक्रम, गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, तंत्रज्ञानयुक्त शिक्षण, लोकसहभागातून शाळा विकास आदी बाबींची राज्य शासनाने दखल घेतली असून या बाबी शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणाऱ्या आहेत, त्यामुळे या शैक्षणिक पॅटर्नची राज्यभरामध्ये अंमलबजावणी करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न-कृषीमंत्री दत्तात्रय भरणे – सविस्तर बातमी

खेड तालुक्यातील जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळा ही ‘टी ४’ जागतिक संस्थेने केलेल्या ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल कॉम्पिटिशन’ स्पर्धेमध्ये जगभरातील समुदायाने पसंती क्रमानुसार केलेल्या मतदानानुसार सर्वाधिक मते मिळवून ‘कम्युनिटी चॉइस ॲवॉर्ड’ या मानाच्या विभागात सर्वोत्कृष्ट ठरली असून या पार्श्वभूमीवर आयोजित ग्रामस्थांसोबतच्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

भुसे यांनी जालिंदरनगर शाळेतील शिक्षक दत्तात्रय वारे यांच्यासह मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, व्यवस्थापन समिती, विद्यार्थी व ग्रामस्थांना शुभेच्छा देत अभिनंदन केले. त्यापूर्वी त्यांनी वाबळेवाडी येथील शाळेला भेट दिली.

कार्यक्रमास आमदार बाबाजी काळे, राज्याचे शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, संचालक (योजना) कृष्ण कुमार पाटील, सहसंचालक हारुण आत्तार, उपसंचालक गणपत मोरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, विविध जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, सामाजिक संस्था, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

भुसे म्हणाले, शिक्षक दत्तात्रय वारे यांनी जिल्हा परिषद वाबळेवाडी आणि जालिंदरनगर येथील शाळा लोकसहभागातून विकसित केली आहे. शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, सामाजिक सेवाभावी संस्था यांनी खऱ्या अर्थाने अथक कष्टातून जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळेला राज्य, देश आणि जागतिक पातळीवर नावलौकिक, मानांकन मिळवून दिला आहे. गावाने ठरवले तर शाळेच्या विकासाचे चित्र बदलू शकतो, हा एक आदर्श येथील ग्रामस्थांनी घालून दिला आहे. या माध्यमातून वारे यांनी केलेले कार्य आपल्याकरिता प्रेरणादायी आहे. ग्रामस्थांनी केलेल्या सूचनांची दखल घेत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीची ‘डाटा बँक तयार करण्याचे काम सुरू

राज्यात विविध आदर्श, प्रतिभावंत, उपक्रमशील शिक्षक असून ते समर्पित भावनेने ज्ञानदानाचे काम करीत असतात, त्यांनी वाबळेवाडी आणि जालिंदरनगर या उपक्रमशील शाळेचे अनुकरण करावे. राज्यशासनाच्यावतीने अशा समर्पित भावनेने काम करणारे शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांची ‘डाटा बँक’ तयार करण्याचे काम सुरु आहे. वारे यांनी राज्यातील या शिक्षकांना मार्गदर्शन करण्याचे काम करावे. राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अपेक्षित काम करुया, असे आवाहन भुसे यांनी केले.

शिक्षण हा मुख्यमंत्र्यांचा जिव्हाळ्याचा विषय

शिक्षण हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय असून त्यांचे शिक्षण विभागाकडे विशेष लक्ष आहे. यावर्षीच्या शाळा प्रवेशाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याकरिता राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, आनंददायी, आधुनिक शिक्षण देण्याचा प्रयत्न

शिक्षण विभागाचा ‘राष्ट्र प्रथम’ हा संकल्प आहे, त्यामुळे राष्ट्रीयत्वाचे शिक्षण तसेच विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे करण्याचे शैक्षणिक क्षेत्रात काम होत आहे. आगामी काळात शिक्षण विभागात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी शाळांचा पायाभूत विकास, शिक्षकांच्या मागण्या, विद्यार्थी हित, लोकसहभाग आदी बाबी विचारात घेता विविध धोरणात्मक निर्णय घेण्यात आले असून त्याची अंमलबजावणी सुरु आहे. येत्या काळात त्याचे प्रतिबिंब राज्यात दिसेल. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, आनंददायी, कौशल्ययुक्त, आधुनिक पद्धतीने शिक्षण देण्याकरिता शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे.

येणाऱ्या २६ जानेवारी २०२७ रोजी राज्यात एकाच वेळी देशभक्तीपर गीतावर कवायत आयोजित करुन विश्वविक्रम करण्याचा निर्धार करण्याचे आवाहन करुन त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांचे सराव सुरु करण्याचा सूचना भुसे यांनी दिल्या. यावेळी काळे म्हणाले, जालिंदरनगर येथील शाळेत आधुनिक, पर्यावरण पूरक, अध्यात्मिक शिक्षण देण्याचे काम होत आहे, खऱ्या अर्थाने या ठिकाणी संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम आगामी काळात होणार आहे. राज्यातील उपक्रमशील शिक्षकांनी आपली शाळा जागतिक पातळीवर झळकली पाहिजे, यादृष्टीने मनात संकल्प करुन काम करीत राहावे, असे आवाहन काळे यांनी केले.

सिंह म्हणाले, वाबळेवाडी आणि जालिंदरनगर सारखी शाळा निर्माण करायची आहे आणि विद्यार्थ्यांना कोडिंग, सिम्युलेशन, रोबोटिक्स सारखे आधुनिक शिक्षण देण्याचा राज्यातील प्रत्येक शिक्षकांनी निर्धार केला पाहिजे. शहरातील मोठमोठ्या शाळेतील सुविधा या ग्रामीण भागातील शाळेत लोक सहभागातून निर्माण केल्या आहेत, यामध्ये श्री. वारे यांची जिद्द, तळमळ आणि लोकसहभाग यांचा सहभाग महत्वाचा आहे. समाजातील दानशूर व्यक्ती हे उपक्रमशील शिक्षकांला मदत करण्यास तयार आहे, आपण आपल्या क्षमता सिद्ध करण्याची संधी आहे, वारे यांना पुढील वाटचालीस सिंह यांनी शुभेच्छा दिल्या.

रेखावार म्हणाले, राज्यातील शिक्षकांची गुणवत्ता अतिउच्च असून त्यांनी प्रेरित होऊन काम केल्यास जालिंदरनगर सारखी शाळा निर्माण होतील. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व परिषदेने आधुनिक तंत्रज्ञान, कोडिंग,रोबोटिक्स या विषयावर काम सुरू केले आहे, विविध उपक्रमात सक्रिय पणे सहभागी व्हावे, असे आवाहन रेखावार यांनी केले.

पाटील म्हणाले, पुणे जिल्ह्यात ‘मॉडेल स्कुल’ उभारण्याचे काम सुरु असून यामध्ये विद्यार्थ्यांचे आरोग्य पत्र, इस्रो, नासा संस्था भेट असे विविध उपक्रम असून त्याचाच एक भाग म्हणून आज सृजन प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले आहे. अशाच प्रकारच्या २५ प्रयोगशाळा मॉडेल स्कुलमध्ये येणार आहे. येत्या १३ व १४ नोव्हेंबर रोजी पुणे येथे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे साहित्य संमेलन आयोजन केले जाणार आहे, असेही पाटील म्हणाले.

वारे म्हणाले, समाजात जिल्हा परिषदेच्या शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन दुय्यम दर्जाचा आहे. जालिंदरनगर येथील शाळेने जागतिक पातळीवर मिळवलेले यश हे त्याला उत्तर आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत गुणवत्ता आहे त्यामुळे आगामी काळात गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन जिल्हा परिषदेच्या शाळेला जागतिक पातळीवर नेण्याचे काम करुया. याकरीता केवळ इच्छाशक्ती, दृढ संकल्प निरंतर वाटचाल आणि लोकसहभाग महत्वाचा आहे, असेही श्री. वारे म्हणाले. भुसे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांकडून करण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रम, प्रयोगाबाबत माहिती घेवून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

भुसे यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक दत्तात्रय वारे तसेच शाळेकरिता जागा देणाऱ्या व्यक्ती, सामाजिक उत्तर दायित्व निधी देणाऱ्या सामाजिक संस्थांचा सत्कार करण्यात आला. तसेच जागतिक बालिका दिनानिमित्त विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.

सृजन प्रयोगशाळा

जालिंदरनगर येथील शाळेत काळाची गरज लक्षात घेता एआय टूल्स च्या माध्यमातून रोबोटिक्स, कोडींग, सिम्युलेशन अशा विषयावर कृत्रिम बुद्धीमत्तेचे आधुनिक शिक्षण मिळणार आहे. ही लॅब सिमुसॉफ्ट टेक्नॉलॉजीसद्वारे उभारण्यात आली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×