महमंदवाडीत भरदिवसा महिलेचे मंगळसूत्र हिसकावले
marathinews24.com
पुणे – शहरातील विविध भागात दुचाकीस्वार सोनसाखळी चोरट्यांनी धुडगूस घातला असून, पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे. दरदिवशी या ना त्या भागातील महिलांना टारगेट करुन दागिने हिसकावून नेले जात आहेत. याकडे मात्र स्थानिक पोलिसांना लक्ष द्यायला वेळच नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे चोरट्यांचे फावले आहे. चक्क दिवसाढवळ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेण्यापर्यंत चोरट्यांची मजल वाढली आहे. त्यामुळे महिलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आयपीएल सट्टा, रेसकोर्स गुंंतवणुकीवर दाखवले करोडोंचे आमिष – सविस्तर बातमी
कामावर जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबलेल्या महिलेजवळ येउन दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ६० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना २२ एप्रिलला सकाळी सव्वा नउच्या सुमारास महमंदवाडीतील रहेजा व्हिस्टा फेज तीनमध्ये घडली आहे. याप्रकरणी ४७ वर्षीय महिलेने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी दुचाकीस्वार दोघा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करीत तपासाला गती दिली आहे. आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरट्यांचा माग काढला जात असल्याची माहिती काळेपडळ पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे तपास करीत आहेत.
पीएमपीएल बसप्रवासात अडीच लाखांचे दागिने चोरले
पुणे-गर्दीचा फायदा घेउन चोरट्याने पीएमपीएल बसप्रवास करणार्या महिलेच्या पिशवीतून तब्बल २ लाख ४० हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना २१ एप्रिलला सकाळी सव्वा अकराच्या सुमारास बालाजीनगर ते सिटीप्राईड चौकादरम्यान प्रवासात घडली आहे. याप्रकरणी महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेची आई बसप्रवास करीत असताना चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतून दागिन्यांची चोरी केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.