आजची सकाळ उजाडली ती भयंकर दुर्घटनेच्या बातमीने
marathinews24.com
पुणे – नेते किंवा अभिनेते यांच्या रस्ते अपघात असो किंवा विमान अपघात अशा बातम्या कानावर आला की त्या बऱ्याचवेळा खऱ्या ठरू नये असं आतून वाटतं. पण त्या वाटण्याला अर्थ नसतो. अनेकदा त्या खऱ्या ठरतात. काही वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडे यांच्या गाडी अपघाताची बातमी अशीच सकाळी सकाळी आली होती आणि आज अजित पवार यांच्या विमान अपघाताची. सोशल मीडियावर वाचून, काहींच्या फोनवर ऐकून पोटात ढवळून आलं. नेते, अभिनेते नात्यागोत्याचे नसले तरी त्यांच्या अकाली, अपघाती जाण्याने खूप आतून तुटतं. जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालेलं असतं.
विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू – सविस्तर बातमी
अजित अनंत पवार किंवा अजित दादा पवार
महाराष्ट्राच्या राजकारणात दादा, भाई यांची चलती असतेच. वसंतदादा यांच्या नंतर दादा हे बिरूद शोभलं ते अजित पवार यांनाच.
वरकरणी रुक्ष वाटावं असा स्वभाव. म्हणजे कठोर, चिडके, आवाजात जरब, रोखठोक, सडेतोड blunt धारदार. स्पष्टवक्ते पणा आणि फटकळपणा यांच्यातली सीमारेषा अत्यंत धूसर असते. दादा ही सीमा अनेकवेळा सहज पार करत. दादांचा वचक असायचा. प्रशासनावर पकड, वक्तशीरपणा, जे ओठात ते पोटात. स्वच्छता, टापटीप यांची आवड. सकाळी 6 च्या ठोक्याला हा बाबा कामाला लागत असे. अधिकारी असो वा सहकारी धसका च घ्यायचचे पाहणी दौरा असेल. कधी कुणावर बरसतील याचा नेम नाही पत्रकारही सुटायचे नाहीत.
आपल्या या कार्यशैली तून दादांनी एक धडाकेबाज, दबंग, कार्यक्षम नेता अर्थात कामाचा माणूस ही प्रतिमा निर्माण केली आणि ती शेवटपर्यंत जपली. आपण राजकारण करतो कुणी साधू संत नाही. राजकारण म्हणजे त्यात सगळं आलं याचं पक्क, व्यवहारिक भान त्यांना होतं. प्रोफेशनल पॉलिटिशियन. आपली उपयुक्तता, आपली क्षमता, आपल्या मर्यादा आपलं उपद्रव मूल्य न्यूसेन्स माहिती असलेला आणि त्याबर हुकूम डावपेच खेळणारा, चाली चालणारा राजकीय दृष्ट्या चतुर नेता म्हणजे अजित पवार. सरकार कोणत्याही विचार धारेचं असो, मुख्यमंत्री कुणीही असो उपमुख्यमंत्री मीच आणि अर्थमंत्रीही (अपवाद वगळता ) मीच हे समीकरण जवळपास गेल्या 20 वर्षात ठरून गेलेलं. पण यामुळे मुख्यमंत्री पद मात्र सतत हुलकावणी देणारं. त्याला गवसणी घालण्याची इच्छा मात्र अपूर्ण राहिली. स्वतः तसं बोलून न दाखवणारे पण अनेकांच्या मनातील मुख्यमंत्री कदाचित न झालेले सर्वोत्तम नाही पण उत्तम मुख्यमंत्री….
सत्तेत राहिलो तरच विकास करू शकतो अशी अजब वाटणारी लाईन त्यांनी अलीकडे घेतली आणि स्वतः अनेक वर्षे विरोधी पक्षात राहून, सभागृहाही विरोधी पक्षनेते म्हणून कामगिरी बजावून अजित पवार यांनी सत्तेची कास धरली. सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्ष हा आपल्या पक्षाचा आत्मा, विचार सरणी म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्याच शब्दात भाजप सोबत अ नैसर्गिक युती केली. राजकीय सोयरीक केली. विकास हे सांगायला पण ed, cbi, it च्या टांगत्या तलवारी पासून बचाव हे मुख्य कारण. 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा असो वा शेकडो कोटींचा बँक घोटाळा. जमीन घोटाळे,आर्थिक घोटाळे केल्याचे आरोप अजित पवार यांच्यावर सतत होत राहिले पण सिद्ध झाले नाहीत. तपास सुरूय, चौकशी सुरूय क्लीन चिट नाही असं सत्ता धारी, आरोप करणारे म्हणत असले तरी दादांनी फिकीर केली नाही उलट ज्यांनी आरोप केले त्यांच्या सोबतच मी आहे ना, नुसता नाही तर उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आहे ना असं दरडावून डंकेकी चोट पर सांगायला कमी केलं नाही.
काका शरद पवार हे दैवत. त्यांच्याच तालमीत दादा तयार झालेले पण त्यांच्या छायेतून बाहेर पडले. झाडाखाली वाढलेलं झाड झाले नाहीत. शरद पवार यांची पुण्याई त्यांनी कधी नाकारली नाही पण तुमच्या पोटी जन्माला आलो नाही ही माझी चूक झाली का, आता थांबा, मार्गदर्शन करा, आशीर्वाद द्या असं म्हणायला ही कमी केलं नाही. मुख्यमंत्री पद न मिळण्यापेक्षा आपण मुख्यमंत्री पदाला योग्य, पात्र आहोत असं शरद पवारांना का वाटत नाही ही सल त्यांना अधिक बोचत असावी.
मुंडे यांचं जसं आई काना तसं दादांचं ह्यो का, लका भाषेचा बाज ग्रामीण, गावात सभा असली तर ग्राम्य भाषेत पाचकळ विनोद करण्याची अंगलट येणारी खुमखुमी, जीभ कधी घसरेल याचा नेम नाही, स्वतः ला टग्या. म्हणणं असो किंवा दुसऱ्याला बोल लावणं असो जीभ सळसळत असायची. 24 तास न्यूज चॅनेल्स चा ससेमीरा आणि मोबाईल कॅमेऱ्यांचा पिच्छा, यामुळे दादा सतत व्हायरल व्हायचे. या व्हायरलचा तापही व्हायचा. माध्यमकर्मी सोबत खटके उडायचे पण जिव्हाळ्याचे संबंधही होते. आपण काही बोललो की tv वर ब्रेकिंग न्यूजची पट्टी झाली सुरू असं हातवारे करून स्वतःच सांगायचे. भाषणातही स्वतः चं उदाहरण ठेवून कार्यकर्ते, पदा धिकारी यांना जपून बोला म्हणत स्वतः च स्वतः वर हसायचे. कधी चिडके व्हायचे पण दादा हे मीडियाचे लाडके होते. दादांची दादा गिरी, दबंगगिरी कायम चर्चेत असायची. त्यांच्याशी लाख मतभेद असणाऱ्यला पण त्यांच्या व्यक्ती मत्वाची, शैलीची भुरळ पडायची.
बारकाईने वृतपत्र वाचन, न्यूज चॅनेल्सवर update घेणं यामुळे आंतर राष्ट्रीय पातळी वर काय घडतंय या बाबत माहितगार असायचे. कोरोना काळात याचा प्रत्यय आला. घार हिंडते आकाशी लक्ष तिचे पिलापाशी उक्ती प्रमाणे बारामती वर त्यांचं लक्ष असायचं.पुणे, बारामती इथं ते खुलायचे. मुलगा पार्थचा मावळ लोकसभा निवडणुकीत पराभव, पत्नी सुनेत्रा यांचा बारामती लोकसभा निवडणुकीतला पराभव किंवा पुणे, पिंपरी चिंचवड इथं महापालिका निवडणुकीला जिव्हारी लागेल असा पराभव असे अनेक पराभव वाट्याला आले असले तरी अजित पवार खचत नव्हते उलट नव्या दमाने काय चूका झाल्या त्यावर विचार करत कामाला लागत. शरद पवार यांच्या प्रमाणे 24 तास राजकारण करत. राजकारण हाच त्यांचा श्वास, ध्यास पिंड होता. कधी कधी उद्वेगानं ते राजकारण सोडून शेती वाडी करतो म्हणत पण ते तेवढ्या पुरतं असे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक हे तर दादांचं ग्राउंड होतं. त्यातच होम ग्राउंड पुणे जिल्ह्यात भाजपानं त्यांना घेरलेलं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेळी सगळे उमेदवार एकाच चिन्हवर घड्यळावर याची खबरदारी त्यांनी घेतली होती.
Zp प्रचाराचा बिगुल आज च ते बारामती तालुक्यात विविध ठिकाणी फुंकणार होते. राजकारणात चढ उतार असतात अपयश आलं, पराभव झाला तरी नव्या उमेदीने भरारी घ्यायची हा दादांचा स्वभाव, शैली नवनवीन टप्पे गाठणारे त्यांचं विमान मुंबईहून टेक ऑफ घेऊन बारामतीत लँड होताना क्रॅश झालं. बारामती-मुंबई-बारामती प्रवास त्यांनी अनेकदा केला. बारामतच्या कुशतच ते वाढले आणि तिथंच विसावले.बारामतीकर, पवार कुटुंबीय आणि विशेषत: शरद पवार यांना दादांचं अकाली, अपघाती जाणं हा मोठा धक्का आहे. यातून त्यांना सावरण्याचं बळ मिळो ही इच्छा. उमद्या स्वभावाचे नेते अजित दादांना आदरांजली.
























