कात्रजमध्ये हल्ला: दोघांवर शस्त्राने वार, टोळक्यावर गुन्हा दाखल
Marathinews24.com
पुणे – वैमनस्यातून टोळक्याने दोन तरुणांवर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना कात्रज भागातील आंबेगाव परिसरात घडली. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले असून, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
यश खंडू कांबळे (वय २३, रा. ग्रीन हिल पार्क सोसायटी, जैन मंदिराजवळ, कात्रज), सार्थक उर्फ ओम नितीन पंडीत (रा. अटल चाळ, कात्रज) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ओंकार सुनील ढेबे, अनुज शिवराज लोखंडे, अमन जाफर शेख, रामेश्वर जाधव, आदित्य जालिंदर शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यश कांबळे याने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश कांबळे आणि त्याचा मित्र सार्थक पंडीत शनिवारी रात्री अकराच्या सुमारास दुचाकीवरुन कात्रजकडे निघाले होते. त्यावेळी आंबेगाव बुद्रुक परिसरात दुचाकीस्वार यश आणि त्याच्याबरोबर असलेला मित्र सार्थकला आरोपींनी अडवले. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन तीक्ष्ण शस्त्राने वार केले. जखमी झालेल्या दोघांना पोलिसांनी रुग्णालायत दाखल केले. सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे तपास करत आहेत.