पाटील इस्टेट भागात वाहनांची तोडफोड, टोळके पसार..
Marathinews24.com
पुणे – शहरातील विविध भागात टवाळखोराकडून वाहन तोडफोड करीत परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. अशीच वाहन तोडफोड मुंबई-पुणे रस्त्यावरील पाटील इस्टेट भागातील महात्मा गांधी वसाहतीत झाली आहे. टोळक्याने कोयते उगारून तीन ते चार दुचाकींची तोडफोड केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
राजजूनी फौजानसिंग याच्यासह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सय्यद नूरजहाँ इराणी (वय ५६, रा. महात्मा गांधी वसाहत, पाटकर प्लाॅट, पाटील इस्टेट,) यांनी खडकी पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दरवाजे उघडे ठेवणे पडले महागात सव्वातीन लाखाची चोरी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजजूनी आणि साथीदार बुधवारी रात्री महात्मा गांधी वसाहतीत शिरले होते. कोयते उगारून त्यांनी परिसरात नागरिकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपींनी दहशत माजवून वसाहतीत लावलेल्या तीन ते चार दुचाकींची तोडफोड केली. दहशत माजवून आरोपी पसार झाले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले तपास करत आहेत. दरम्यान, वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी येरवडा भागात टोळक्याने कोयते उगारुन दहशत माजविली होती. नागरिकांच्या घरावर कोयते आपटून आरोपी पसार झाले होते.