उकाड्यापासून हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा
marathinews24.com
पुणे – उन्हाच्या तीव्र झळांनी हैराण झालेल्या पुणेकरांना आज सकाळी ११ वाजल्यापासून अवकाळी पावसाने दिलासा दिला. मात्र ऐनवेळी पावसाने बरसायला सुरुवात केल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते आणि साडे अकराच्या सुमारास शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कोथरूड, सिंहगड रोड, कोंढवा, कात्रज, औंध रोड, धायरी फाटा, सन सिटी रोड या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. काही भागांत विजांचा कडकडाटही अनुभवायला मिळाला.
शहरात गेल्या दोन दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली होती. सोमवारी दुपारीही ढगाळ वातावरण तयार झाले होते. पावसामुळे तापमानात घट झाली असून हवेत गारवा निर्माण झाला. भारतीय हवामान विभागाने पुण्याला येलो अलर्ट दिला असून १८ मेपर्यंत पुण्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरींसह विजांचा कडकडाट होण्याचा इशारा दिला आहे.
पावसाच्या ऐनवेळी आगमनामुळे काही ठिकाणी शहरात वाहतुकीत खोळंबा झाला असून, नागरिकांना कामाच्या वेळेत अडथळ्यांना सामोरे जावे लागले. तरीही, अचानक आलेल्या या सरींमध्ये भिजण्याचा आनंद पुणेकरांनी घेतला.
पुणेकरांनो आपली दुचाकी सावकाश चालावा
पावसाची सुरुवात झाल्यामुळे सुरुवातीला रस्ते निसरडे झालेले असतात. यामुळे दुचाकी घसरण्याचे बऱ्याचदा प्रकार घडले आहेत. रस्त्यावरील पडलेले ऑईल, धूळ आणि टायर घासून निर्माण झालेला कार्बन यामुळे रस्ता निसरडा झालेला असतो. त्यामुळे पुणेकरांना आपली दुचाकी चालविताना जरा जपूनच चालवावी लागणर आहे.