नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोंधळी व भटक्या विमुक्त जाती जमाती विकास संघातर्फे मेळाव्याचे आयोजन
marathinews24.com
पुणे – गोंधळी कलाकारांचा अपघाती विमा, कागदपत्रे मिळण्यात येणाऱ्या अडचणी सोडवणे आणि त्यांच्या मुलांचे शिक्षण, माता-भगिनींचे सक्षमीकरण हा त्रिसूत्री कार्यक्रम राबविला जाणार आहे. गोंधळी, डवरी व जागरण गोंधळाशी संबंधित अन्य भटक्या विमुक्तांसाठी आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्र आणि कलाकारांचे मानधन यावरही काम करणार असल्याचे गोंधळी व भटक्या विमुक्त जाती जमाती विकास संघाचे अध्यक्ष परेश गरुड यांनी सांगितले.
धर्मवीरांना सामूहिक तर्पणः अरुंधती फाऊंडेशनतर्फे २१ सप्टेंबर रोजी विशेष कार्यक्रम – सविस्तर बातमी
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोंधळी व भटक्या विमुक्त जाती जमाती विकास संघातर्फे गोंधळी कलाकारांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. नवी पेठेतील पत्रकारसंघाच्या सभागृहात झालेल्या या मेळाव्यात भटके विमुक्त विकास परिषदेचे स्वामी धनगर, सद्भाव गती विधी पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे रवी ननावरे, आयुर्विमा प्रतिनिधी विद्या गुगळे, राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयातील लोककला अनुदान विभागाचे सदस्य खोडे आदी उपस्थित होते. ४५ पेक्षा अधिक कलाकारांनी मेळाव्याला उपस्थित लावली.
परेश गरुड म्हणाले, प्रामुख्याने कलाकार, त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी काम करण्याचे ठरले. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या अडचणी दूर करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासह किमान पदवीचे शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. २२ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवात गोंधळी कलावंतांचा एक लाख रुपयांचा अपघाती विमा संस्थेमार्फत उतरवण्यात येणार आहे. कलाकारांचे आरोग्य, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक अकाउंट, रहिवासी दाखला, उत्पन्नाचे दाखले व कलाकार पेन्शन या विषयात काम करायचे निश्चित करण्यात आले आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत पुणे शहर व जिल्ह्यातील ५०० कलाकारांची नोंदणी करून शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.”
विद्या गुगळे यांनी आयुर्विमाचे महत्व याविषयी माहिती दिली. स्वामी धनगर यांनी भटके विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या योजनांविषयी सांगितले. खुडे यांनी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना कलाकारांना अवगत केल्या. जितेंद्र वाईकर यांनी सूत्रसंचालन केले. हरीश पाचंगे यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत रेणके यांनी आभार मानले.



















