व्यसनमुक्ती केंद्रात फी न भरल्यामुळे तरुणावर अमानुष मारहाण; नांदेड सिटी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल
Marathinews24.com
पुणे – व्यसनमुक्ती केंद्रात भावाला दाखल केल्यानंतर मित्रांकडून फी साठी घेतलेले पैसे परत न केल्याने तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सिद्धार्थ पवार (रा. गारमाळ, रायकरनगर, धायरी), कार्तिक उर्फ पप्पू बाळकृष्ण लोणारे (रा. लोणारे वस्ती, धायरी), बबलू कसाळे (रा. धायरी) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे. सूरज अरुण गायकवाड (वय ३०, रा. लोणारे वस्ती, धायरी) याने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गोखले राज्यशास्त्रीय संस्थेतील निधी नियमबाह्य वळवला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज गायकवाड याचा भाऊ आकाशला दारू पिण्याचे व्यसन आहे. त्याला सिद्धार्थ पवार याचे सिंहगड रस्त्यावरील खानापूर परिसरात व्यसनमुक्ती केंद्र आहे. व्यसनमुक्ती केंद्रात आकाशला १५ मार्चला दाखल करण्यात आले होते. १० दिवसांसाठी चार हजार रुपये आणि ने-आण करण्यासाठी एक हजार रुपये असे पाच हजार रुपये सिद्धार्थ पवार याला द्यायचे ठरले होते. ३१ मार्च रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास सूरज गायकवाड धायरीतील उंबऱ्या गणपती चौकातून निघाला होता. त्यावेळी तेथील दुकानासमोर सिद्धार्थ पवार, कार्तिक लोणारे, बबलू कसाळे थांबले होते.
त्यावेळी त्यांनी सूरज याच्याकडे व्यसनमुक्ती केंद्राची फी मागितली. तेव्हा त्याने माझ्याकडे पैसे नसल्याचे त्यांना सांगितले. त्यावेळी तिघांनी त्याला रस्त्यात मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपी लोणारेने त्याला कोयत्याचा धाक दाखवून धमकावले. ‘मी या भागातील दादा आहे. माझ्या नादी लागायचे नाही. व्यसनमुक्ती केंद्रातील फी आता दिली नाही, तर जिवे मारत”, अशी धमकी देण्यात आली.
मारहाणीचा प्रकार सुरू असताना नागरिक जमले. तेव्हा तिघांनी दहशत माजविली. सूरज आरोपींच्या तावडीतून पळाला. लोणारे हा सराइत आहे. त्याच्या दहशतीमुळे सूरजने तक्रार दिली नव्हती. आरोपी पुन्हा मारहाण करतील, अशी भीती वाटल्याने सूरजने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे तपास करत आहेत.