खराडीतील नागरिकाने ३ दिवसात गमावली रक्कम
Marathinews24.com
पुणे – पैशांचा लोभ माणसाला किती घातक ठरू शकतो, याची अनेक उदाहरणे पुण्यात घडत आहेत. प्रामुख्याने सायबर चोरट्यांकडून नागरिकांकडून नानाविध प्रकारचे आमिष दाखवून ऑनलाईनरित्या फसवणूक केली जात आहे. एकीकडे पोलिस प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही उच्चशिक्षित सायबर चोरट्यांच्या जाळ्यात सापडत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दिवसेंदिवस सायबर फसवणूकीच्या घटनांमुळे ऑनलाईन बॅकिंग करावे की नाही, असाही प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे.
प्रवाशावर चाकूचा धाक दाखवत दीड लाखांचा आयफोन लंपास – सविस्तर बातमी
शेअर ट्रेडींगमधून कंपनीची व्यक्ती बोलत असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी एकाचा विश्वास संपादित केला. त्यांना शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी सायबर चोरट्यांनी केली. त्यानुसार खराडीत राहणार्या तक्रारदाराने गुंतवणूकीला सुरुवात केली. ८ मार्चला काही रक्कम गुंतवणूक केल्यानंतर त्यांना सायबर चोरट्यांनी काही परतावा दिला होता. विश्वास संपादित झाल्यानंतर तक्रारदाराने गुंतवणूकीला प्राधान्य दिले. अवघ्या तीन दिवसांत त्यांनी तब्बल ३६ लाख ९३ हजार रूपये ऑनलाईनरित्या संबंधितच्या बँक खात्यात वर्ग केले. मात्र, काही दिवसांनी त्यांना सायबर चोरट्यांचा संपर्क बंद असल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ५८ वर्षीय नागरिकाने खराडी पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.
नागरिकांनो, शेअर मार्केटच्या परताव्याच्या आमिषाला भुलू नका
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दामदुपटीचे आमिष दाखवून सायबर चोरटे नागरिकांना जाळ्यात ओढत आहेत. किरकोळ स्वरूपात परतावा दिल्यानंतर विश्वास संपादित करुन लाखो रुपयांची ऑनलाईन रक्कम वर्ग करण्यास भाग पाडत आहेत. पुण्यात मागील काही महिन्यांत अशाप्रकारे कोट्यावधी रुपयांची ऑनलाईन लुट सायबर चोरट्यांनी केली आहे. त्यापार्श्वभूमीवर सायबर विभागासह पोलिसांकडून वारंवार आवाहन केल्यानंतर उच्चशिक्षितांसह अशिक्षीतही सावज ठरत आहेत. ऑनलाईन व्यवहार करण्यापुर्वी नागरिकांनी आपल्या घरातील सदस्यांना विचारणे आवश्यक आहे. शेअर मार्केटमध्ये परताव्याला भुलून कोणीही गुंतवणूक करू नका, असे आवाहन पुणे सायबर पोलिसांनी केले आहे.