राज्यभरातील सराइतांना ७०० ते ८०० पिस्तुलांची विक्री

राज्यभरातील सराइतांना ७०० ते ८०० पिस्तुलांची विक्री

मराटी गावातील शस्त्र कारखान्यावर छापा प्रकरणातील पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार

marathinews24.com

पुणे – मध्य प्रदेशातील उमराटी गावातील स्थानिक कारागिरांकडून पुण्यासह राज्यातील सराईतांना गेल्या सहा ते सात वर्षात देशी बनावटीच्या ७०० ते ८०० पिस्तुलांची विक्री करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी रविवारी दिली. गुंड टोळ्यांना देशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री करणाऱ्या मध्य प्रदेशातील उमराटी गावातील कारखान्यावर पुणे पोलिसांच्या पथकाने शनिवारी पहाटे छापा टाकला.

पोलिसांच्या टीमवर्कमुळेच यशस्वी कारवाई- पोलीस आयुक्त अमितेश कुमार – सविस्तर बातमी 

सनीभाई चावला (वय ३७), जसबिरसिंग प्रकाशसिंग चावला (वय २२), प्रवीणसिंग उत्तमसिंग टकराना (वय २२), राजपालसिंग प्रधानसिंग जुनेजा (वय ३६), अलोकसिंग जोहरसिंग बर्नाला (वय २७), नानाकसिंग अजितसिंग बर्नाला (वय ३२), गुरुचरणसिंग बर्नाला (वय २३, सर्व रा. उमराटी, जि. बडवानी, मध्य प्रदेश) यांना अटक करण्यात आली. रविवारी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. उमराटी गावातील अनेक घरात स्थानिक कारागिर घराघरात पिस्तुले तयार करुन त्याची विक्री करत होते. पुणे शहर परिसरात गेल्या काही महिन्यात घडलेल्या गंभीर गुन्ह्यात सराईतांकडून पिस्तुलांचा वापर करण्यात आला.

गुंड शरद मोहोळ, माजी नगरसेवक वनराज आंदेकर, आयुष काेमकर, गणेश काळे खून प्रकरणात वापरण्यात आलेली पिस्तुले मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेजवळ असलेल्या उमराटी गावातील कारागिरांकडून करण्यात आली होती. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकून कारवाई केली हाेती. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली होती. पोलीस उपायुक्त मुंडे यांच्यासह १०० पोलिसांचे पथक या कारवाईत सहभागी झाली होती. या कारवाईत सहभागी झालेले अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते झाला.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ‘ विमाननगर भागातील घरफोडीच्या गुन्ह्यात चोरट्यांना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी आरोपींकडून पिस्तुले जप्त केली. तपासात मध्य प्रदेशातील उमराटी गावातून पिस्तुले खरेदी करुन आणल्याची माहिती मिळाली होती. गेल्या वर्षी कोथरूडमध्ये गुंड शरद मोहोळ याचा खून झाला होता. मोहोळ, वनराज आंदेकर खून प्रकरणासह शहरातील गंभीर गुन्ह्यात वापरलेली पिस्तुले सराईतांना उमराटी गावातून आणल्याची माहिती मिळाली. उमराटी गावातून पिस्तुले खरेदी करुन ती पुण्यातील गुंड टोळ्यांना विक्री करणारे सराइत आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी गेल्या महिन्याभरात वेगवेगळ्या कारवाईत सराइतांकडून २१ पिस्तुलांसह काडतुसे जप्त केली होती. त्यानंतर उमराटी गावातील पिस्तुले तयार करणाऱ्या स्थानिक कारागिरांच्या कारखान्यांवर छापा टाकण्याचे निश्चित करण्यात आले. गेल्या आठवड्यापासून या कारवाईसाठी पोलिसांनी नियोजन केले होते.’

‘पोलिसांचे पथक शनिवारी पहाटे उमराटी गावात पोहोचले. या कारवाईसाठी ड्रोन, बाॅडी कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आला. कारगिरांकडून पोलिसांवर हल्ले करण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे आवश्यक त्या सर्व तयारीनिशी पुणे पोलिसांचे पथक तेथे गेले होते. मध्य प्रदेशातील पोलिसांसह जळगाव पोलिसांना या कारवाईची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून तेथून पिस्तुले तयार करणाऱ्या कारागिरांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पिस्तुलाचे सुट्टे भाग, तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले. चौकशीत उमराटी गावातील कारागिराांनी देशी बनावटीची ७०० ते ८०० पिस्तुलांची विक्री पुण्यातील गुंड टोळ्यांसह राज्यभरातील सराईतांना गेल्या सहा ते सात वर्षात विक्री केल्याची माहिती मिळाली’, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नमूद केले.

‘मकोका’ कारवाई करणार

‘उमराटी गावातून महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरात, पंजाबमधील सराइतांना देशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री केली आहे. पुण्यातील गंभीर गुन्ह्यातील सराइतांना पिस्तुले पुरविणाऱ्या सराइतांसह उमराटीतील कारागिरांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकाेका) कारवाई करण्यात येणार आहे’, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×