हडपसरमध्ये कुत्र्यावर विकृताचा अनैसर्गिक अत्याचार, हडपसर परिसरात माणुसकीला काळिमा
Marathinews24.com
पुणे – विकृताने पाळीव कुत्र्यावर घरातच अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना सीसीटीव्हीमुळे उघडकीस आली आहे. हडपसर परिसरात ही घटना घडली असून, माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी हलीमुद्दीन शेख (वय ४४, रा. पश्चिम बंगाल) या आरोपीविरुद्ध काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी हलीमुद्दीन शेख असून तो मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. सध्या तो हडपसरमधील हांडेवाडी परिसरात वास्तव्यास आहे. कुत्र्याचा मालक काही कामानिमित्त घराबाहेर गेला असता आरोपीने कुत्र्यावर अनैसर्गिक अत्याचार केला.
काही वेळानंतर मालक घरी परतल्यानंतर कुत्र्याच्या वागणुकीमध्ये अचानक बदल जाणवू लागल्याने त्यांना शंका आली. त्यानंतर मालकाने घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संपूर्ण अमानवी प्रकार उघडकीस आला. या प्रकाराने परिसरात संतापाची लाट पसरली आहे. घटनेची माहिती शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह स्थानिक नागरिकांना मिळाली. त्यांनी तत्काळ यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास काळेपडळ पोलिस करत आहेत.