जत नगरपरिषदेवर भाजपने फडकवला झेंडा; डॉ. रवींद्र आरळी यांचा दणदणीत विजय

जत नगरपरिषदेवर भाजपने फडकवला झेंडा; डॉ. रवींद्र आरळी यांचा दणदणीत विजय

माजी आमदाराच्या पुत्रांचा व नातूचा पराभव

marathinews24.com

जत : (रेवन कोळेकर) – जत नगरपरिषदेवर भाजपने झेंडा फडकवला असून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने नगराध्यक्ष पदासह एकूण ११ नगरसेवक पदावर घवघवीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. अपक्ष उमेदवार फिरोज नदाफ यांनी भाजपला पाठिंबा दिल्यामुळे नगरपरिषदेत भाजपची एका सत्ता स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपचे उमेदवार डॉ. रवींद्र आरळी यांनी काँग्रेसचे उमेदवार सुजय उर्फ नाना शिंदे यांचा २४९६ मतांनी पराभव केला.

महायुतीत आणखी भागीदार वाढवू नका: रामदास आठवले – सविस्तर बातमी 

पहिल्या फेरीपासून डॉ. रवींद्र आरळी यांनी आघाडी घेतली होती, पहिल्या पेरीत ८९९ दुसऱ्या फेरीत १२४७ तर तिसऱ्या फेरीतील ५० मतांची आघाडी घेत त्यांनी विजय मिळवला, त्यामुळे डॉ. रवींद्र आरळी यांना एकूण ९११२ मते तर काँग्रेसचे सुजय शिंदे यांना ६६१६ मते मिळाली.

निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असे बहुपक्षीय लढतीचे चित्र होते. पहिल्या फेरीत प्रभाग क्रमांक १ ते ३ मध्ये भाजपने बाजी मारली तर प्रभाग क्रमांक ४ मध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. दुसऱ्या फेरीत प्रभाग ६ मध्ये भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी झाले तर प्रभाग क्रमांक ७ मध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दोन्ही जागेवर यश मिळवले. प्रभाग ८ मध्ये काँग्रेसच्या दोन्हीही उमेदवारांनी विजय मिळवला. तिसऱ्या फेरीत प्रभाग नऊ मध्ये काँग्रेसचे दोन्ही उमेदवार विजयी झाले व प्रभाग १० मध्ये भाजपचे पवन कुंभार व अपक्ष उमेदवार फिरोज नदाफ यांना समान मते पडल्याने चिठ्ठी काढण्यात आली यात नदाफ यांचा विजय घोषित करण्यात आला. प्रभाग 11 मध्ये काँग्रेसच्या महिला उमेदवार काजल काळे तसेच भाजपचे मिथुन भिसे नंदिनी मठपती यांचा विजय झाला आहे.

निवडणुकीचा निकाल पाहता भाजपला नगराध्यक्ष पदासह ११ जागांवर विजय मिळवता आला. काँग्रेसने माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांचे नेतृत्वाखाली ८ जागा जिंकल्या तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली ३ जागांवर विजय मिळवला. नगराध्यक्ष पदासाठी एकूण ७ उमेदवार रिंगणात होते त्यात भाजपचे डॉ. रवींद्र आरळी (९११२), काँग्रेसचे सुजय शिंदे (६६१६), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे सुरेश शिंदे (३४७०), एकनाथ शिंदे शिवसेनेचे सलीम गवंडी (८६४), माकपचे अर्जुन कुकडे (१४४), अपक्ष नवनाथ पवार (१०६), तर मल्लिकार्जुन हत्ती (६८) यांचा समावेश होता व नोटाला (११४) मते मिळाली.

निकाल हाती येताच आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार डॉ. रवींद्र आरळी यांची जत शहरातून विजय मिरवणूक काढण्यात आली.

माजी आमदार विक्रम सावंत यांच्या पुत्राचा व विलासराव जगताप यांच्या नातूचा पराभव

पहिले फेरीत प्रभाग ३ चा निकाल जाहीर करण्यात आला यावेळी भाजपचे गौतम ऐवाळे यांनी ८७४ निर्णायक मते घेत काँग्रेसचे प्रतिस्पर्धी उमेदवार माजी आमदार विक्रम सावंत यांचे पुत्र धैर्यशील सावंत यांचा १५९ मतांनी पराभव केला, तसेच प्रभाग ११ मधून राष्ट्रवादीकडून रिंगणात असलेले माजी आमदार विलासराव जगताप यांचे नातू संग्राम जगताप यांचा पराभव भाजपचे मिथुन भिसे यांनी मोठ्या फरकाने केला, संग्राम जगताप यांना येथे तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

जतच्या विकासाची ब्ल्यू-प्रिंट जनतेला भावली

जतच्या जनतेने विकासाला कौल दिला आहे आम्ही निवडणुकीदरम्यान मांडलेली विकासाची ब्लू प्रिंट जनतेला भावली जनतेने प्रथमच भाजपला इतके मोठे यश दिले आहे निवडणुकीत दिलेले प्रत्येक वचन पुढील पाच वर्षात पूर्ण करू आज पासूनचे विरोधाचे राजकारण संपले असून विरोधी पक्षातील विजयी उमेदवारांनाही शहराच्या विकासासाठी इकोपाने काम करावे असे आवाहन पडळकर यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×