बाह्यवळण मार्ग चार तास रोखून धरल्यानंतर सौम्य लाठीमार

नसरापूर येथेल बालिकेवर अत्याचार प्रकरणानंतर रोखला होता महामार्ग

marathinews24.com

पुणे – भोर तालुक्यातील नसरापूर येथे बालिकेवर अत्याचार प्रकरणानंतर शनिवारी (२ एप्रिल) सायंकाळी बाह्यवळण मार्गावर आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे मुंबई-बेंगळुरु बाह्यवळण मार्गावरील चार तास ठप्प झाली होती. पोलिसांनी आंदोलक आणि पीडित बालिकेच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. मात्र, काही जण आंदोलन मागे घेण्याच्या स्थितीत नव्हते, आंदोलनामुळे अनेक जण वाहतूक कोंडीत अडकून पडले होते. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करुन सौैम्य लाठीमार केला’, असे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले.

फ्लॅटचे कुलूप तोडून ४ लाखांचे दागिने चोरी – सविस्तर बातमी

नसरापूर प्रकरणानंतर शनिवारी सायंकाळी बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात आंदोलन करण्यात आले. आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याची चित्रफीत रविवारी समाज माध्यमात प्रसारित करण्यात आली. त्यानंतर पुणे पोलिसांकडून याबाबत लेखी स्पष्टीकरण देण्यात आले आहे. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी पोलिसांची बाजू मांडली आहे.
नसरापूर अत्याचार प्रकरणानंतर शनिवारी दिवसभर पीडित बालिकेच्या कुटुंबीयांशी सातत्याने संवाद साधण्यात येत होता. कुटुंबीय थकले होते. पोलीस आणि प्रशासनाने त्यांना लेखी आश्वासन दिले होते. कुटुंबीयांची आंदोलन संपविण्याची इच्छा होती. बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात गर्दी झाली होती. काही जण आंदोलन मागे घेण्यास तयार नव्हते. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी वेळोवेळी संवाद साधला. मात्र, काही जण अडवणूक करण्याच्या भूमिकेत होते. कुटुंबीयांना लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांना सुरक्षितपणे वाहनापर्यंत पोहचविण्यात आले.

रुग्णवाहिकेतून बालिकेचा मृतदेह पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कारासाठी शनिवारी रात्री रवाना करण्यात आला. आंदोलन करणारे काही जण ठाम होते. त्यांना पांगविण्यासाठी सौम्य बलप्रयोग करण्यात आला आणि गर्दी हटविण्यात आली, असे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसर शनिवारी सायंकाळनंतर चार तास वाहतुकीसाठी बंद होता. दुतर्फा १५ किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागली होती. हजारो प्रवासी वाहतूक कोंडीत अडकून पडले होते. त्यात महिला आणि लहान मुले होते. रुग्णवाहिका कोंडीत अडकून पडल्या होत्या. पोलिसांनी हे आंदोलन संयम राखून हाताळले आहे’, असे पोलीस उपायुक्त कदम यांनी नमूद केले आहे

नसरापूर अत्याचार प्रकरण संवेदनशील आहे. पुणे ग्रामीण पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. तपास प्रक्रियेत पीडित बालिकेच्या कुटुंबीयांना विश्वासात घेण्यात आले आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस कटीबद्ध आहेत. नागरिकांनी पोलीस, तसेच न्याययंत्रणेवर विश्वास ठेवावा’, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×