पुण्यात कॉक्रोच जनता पार्टीचा एल्गार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ घोषणांनी दणाणले
marathinews24.com
पुणे – देशभरात गाजलेल्या नीट पेपर परिक्षा फुटीप्रकरणी लाखो विद्यार्थ्यांने नुकसान झाले आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीने गंभीर चळवळ उभी करून देशभरात पोहोचवली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत (दि. १३) राजीनामा न दिल्यास आम्ही नवी दिल्लीत २० जूनला पुन्हा आंदोलन करणार आहोत. त्यासाठी आम्ही जेलमध्येही जायला तयार असल्याचा इशारा, कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी दिला आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी r गुरूवारी (दि. ११)कॉक्रोच जनता पक्षाच्यावतीने पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आला. यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुंग, अॅड. असिम सरोदे, डॉ. विश्वंभर चौधरी, राहूल डंबाळे, कुलदीप अंबेकर, नितीन आंधळे यांच्यासह अनेक विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अभिजित दीपके म्हणाले, नीट परिक्षेची तयारी करणार्या तब्बल ४० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी देशात मागील दोन वर्षांत आत्महत्या केल्या आहेत. आपल्या देशात विद्यार्थ्यांचे मूल्य कमी असून, जोपर्यंत आपण बोलणार नाही, तोपर्यंत हे लोक सर्वांनाच गृहित धरणार आहेत. नवी दिल्लीतील जंतर मंतरवरील सभेपेक्षा पुण्यातील सभा सर्वात मोठी झाली असून, विद्यार्थ्यांची ताकद दिसून आली आहे. दरम्यान, देशात १२ वर्षांपासून हिंदु-मुसलमान धार्मिंक धु्रवीकरण केले जात आहे. या देशाची विभागणी त्यांना करायची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो यापुढे आपण अशा गोष्टींविरूद्ध लढून हिंदु-मुसलमान कधीही करू नका. ४० वर्षांपासून बेरोजगारी असून, आपण शिक्षण, नोकरी, मागितल्यास आपल्याला खड्डेयुक्त रस्ते, पडणारे पुल मिळत आहेत.
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुंग म्हणाले, उज्ज्वल भविष्याकडे जायचे असल्यास शिक्षण आणि पर्यावणाचे मुद्दे महत्वाचे आहेत.सत्य, अहिंसा हा माझा ध्यास असून, अभिजित दीपके यांच्या आंदोलनाचे समर्थन आहे. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावनभूमीतून हे आंदोलन उभा राहिल्यामुळे आनंद झाला आहे. सध्यास्थितीत देशात शिक्षण क्षेत्रात अंधकार निर्माण झाला असून, आपण काय करतो आहे, विद्यार्थी कुठे जाणार, विविध परिक्षा व्यवस्थित झाल्या पाहिजते, याची जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे. दिल्ली, पुणे, अमृतसरसह विविध ठिकाणी लोक एकत्रित येत असून, हीच आपली ताकद आहे. विद्यार्थ्यांचे आयुष्य अंधारातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला सजग राहावे लागणार आहे. त्यासाठी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करा. न्याय मिळाला पाहिजे हाच आमच्या आंदोलनाचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उद्यापासून लखनउसह विविध ठिकाणी आंदोलन
मी उद्यापासून लखनउ, जयपूर, बंगलोर याठिकाणी जाणार आहे. जर धमेंद्र प्रधान यांनी १३ जूनपर्यंत राजीनामा नाही दिला, तर २० जूनला पुन्हा एकदा नवी दिल्लीत आंदोलन करणार आहे. दरम्यान, आमच्या फंडीगबाबत विचारणा करीत भाजप आयटी सेलकडून विद्यार्थ्यांना पाकिस्तानी बोलले जात असल्याचे दीपके यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस, पंतप्रधान मोंदीवरही टीका
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. मुख्यमंत्र्यानी आमच्या आंदोलनाला अराजकत्व संबोधले होते. तसेच आंदोलकांच्या हातात फक्त संविधान आहे, त्यांना याबाबतीत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. मात्र, आमचा त्यांना सवाल आहे, जे डॉ. बाबासाहेबांना मानतात ते अराजकत्व आहे काय असा सवाल केला. संविधानात पहाटेच्या शपथविधीबाबत असे कुठेही लिहले नव्हते, असाही चिमटा काढला.
जातीय तेढ वाढवून फक्त बेरोजगारी वाढवली
काय चाललं आहे या देशात. जगात एआय, नॅचरल एनर्जी यावर शिक्षणाच्या माध्यमातून प्रयोग, संशोधन सुरु आहे. आपण फक्त हिंदु-मुसलमान वाद – विवाद करत बसलो आहे. या देशव्यापी आंदोलनाची सुरुवात पुण्यातून सुरु झाली आहे. मी पुण्यात शिकलो असून, होम ग्राउंडवर आंदोलनाची गर्दी राजीनामा घेतल्याशिवाय राहाणार नाही. लखनऊ, अमृतसर, बेंगलोर वरुन दिल्ली हे आंदोलन होईल. आम्ही जेलमध्ये जाऊ पण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊच असा निग्रह अभिजित दिपके यांनी केला. त्याला उपस्थित लाखो विदयार्थ्यांनी हात उंचावून प्रतिसाद दिला. भाजप आयटी सेल शेम शेम, मोदी मीडिया हाय हाय अशा घोषणा देत विद्यापीठ परिसर दणाणुन गेला.
विद्यार्थ्यांसाठी केल्या मागण्या
पेपर फुटी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नुकसान भरपाईसाठी १० हजार रूपये द्यावे
परिक्षा रद्द झाल्यास मदत म्हणून विद्यार्थ्यांना १० हजार द्यावे
परिक्षेचा निकाल उशिरा लागल्यास पैसे द्यावे.
लिखीत पेपर असल्यामुळे ते मनुष्यबळानेच तपसावेत
पेपरफुटी झाल्यास ७२ तासांच्या आत बॅकअप तारीख ठरवा
कंपनीचे टेंडर तपासणे गरजेचे, नातेवाईकांच्या कंपन्या रद्द करा
एनसीआरटी नकाशा परत आणा.




















