बँक खाते वापरासाठी देणे ठरले महाग; दीड कोटींच्या सायबर व्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शेअर ट्रेडिंग आणि आयपीओमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तरूणाची तब्बल ५३ लाख ११ हजारांची फसवणूक केली आहे. ही घटना १२ जून ते १४ जुलै २०२५ कालावधीत केसनंद गावात घडली आहे. याबाबत केसनंद गावातील ३८ वर्षीय तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, बँकधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सराईत दोन किलोमीटर पळाला, बिल्डींगवरही लपला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूणाने १२ जुलै २०२५ रोजी सोशल मीडियावरील शेअर ट्रेडिंगसंदर्भात लिंकला क्लिक केले होते. त्यानंतर सायबर चोरांनी त्यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करून घेतले. शेअर ट्रेडिंग आणि आयपीओ मध्ये गुंतवणूक केल्यास १० ते ३० टक्के पर्यंत नफ्याचे आमिष सायबर चोरट्यांनी दाखवले. अॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडून तब्बल ५३ लाख १३ हजार ५०० रुपये भरण्यास भाग पाडले. त्यापैकी ३ हजार ४०० रुपये सायबर चोरांनी तक्रारदाराला परत केले. ५३ लाख ११ हजारांची त्यांची फसवणूक केली. याप्रकरणाचा तपास सायबर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे करत आहेत.
बँकखात्याचा गैरवापर, दीड कोटींची रक्कम स्वीकारली
ग्राहकाने बँकेत खाते उघडल्यानंतर त्यामध्ये व्यवहार करण्यासाठी सायबर चोरट्यांचा हस्तांतरित केल्यानंतर त्याद्वारे कोट्यावधींचा सायबर गैरव्यवहार झाला आहे. या प्रकरणी बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित बँकखात्यात तब्बल १ कोटी ६० लाख रूपयांचे फसवणूकीतील व्यवहार करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार बँकखातेधारकासह वापरकर्त्याविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने एस बँकेत खाते उघडले होते. त्यानंतर संबंधित बँकखाते त्याने व्यवहारासाठी एकाला वापरण्यासाठी दिले होते. त्याचा गैरवापर करीत सायबर चोरट्याने तब्बल १ कोटी ६० लाखांचे व्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी डेटा इंडिया सायबर को-ऑपरेशन सेंटर दिल्ली विभागाने नुकताच पुणे सायबर विभागाला अहवाल दिला आहे. त्याअनुषंगाने आता बँकखाते वापरण्यास देणार्या आणि गैरव्यवहार झालेल्या खातेधारकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक विजय खिल्लारे तपास करीत आहेत.





















